अनोख्या उपक्रमातून दुचाकीस्वारांना शिस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनोख्या उपक्रमातून दुचाकीस्वारांना शिस्त
अनोख्या उपक्रमातून दुचाकीस्वारांना शिस्त

अनोख्या उपक्रमातून दुचाकीस्वारांना शिस्त

sakal_logo
By

मनोर, ता. २२ (बातमीदार) : दुचाकीवरील सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेटचा वापर करण्याच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करण्यासाठी पालघर वाहतूक शाखेने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि विनाहेल्मेट असलेल्या दुचाकीस्वारांना वाहतूक पोलिसांकडून दंडाऐवजी सवलतीच्या दरात हेल्मेटचे वाटप करण्यात आले. मंगळवारी (ता. २१) बोईसर शहरात राबवलेल्या मोहिमेत जवळपास ५० दुचाकीस्वारांना दंडाऐवजी फक्त ३०० रुपयांमध्ये हेल्मेट देण्यात आले.
पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला उपक्रम जिल्हाभर राबवण्यात येणार असल्याची माहिती पालघर जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी आसिफ बेग यांनी दिली. पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्ग, मनोर-पालघर रस्ता, पालघर-बोईसर तसेच चिल्हार-बोईसर रस्ता आणि अन्य रस्त्यांवर होत असलेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत शेकडो दुचाकी चालकांचे बळी गेले आहेत. अपघातादरम्यान हेल्मेटचा वापर न केल्यामुळे डोक्याला मार लागून मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अधिक आहे.

---------------------------
उपक्रमाचे दुचाकीस्वारांकडून स्वागत
दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई न करता तात्काळ नवीन हेल्मेट विकत घ्यायला लावून वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत जनजागृती करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. वाहतूक नियमांच्या उल्लंघनप्रकरणी रोख रकमेचा दंड भरण्यासाठी वाहनचालक तयार होत नाहीत. दंड भरल्यानंतर वाहतूक नियमांच्या पालनाबाबत गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे पालघर वाहतूक शाखेने वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. वाहतूक पोलिसांच्या या उपक्रमाचे दुचाकीस्वारांकडून स्वागत केले.