धाडसी निर्णय घेणारे महाराष्ट्र पहिले राज्य

धाडसी निर्णय घेणारे महाराष्ट्र पहिले राज्य

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ : सर्वसमावेश नागरिकांना न्याय देणारा असा राज्याचा अर्थसंकल्प आहे. आमचा वैयक्तिक असा कोणताही अजेंडा नाही. राज्याचा सर्वांगीण विकास करत त्याला प्रगतीकडे नेण्यासाठी डबल इंजिन सरकार वेगाने काम करत आहे. नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडले पाहिजे ऐवढेच आमचे प्रयत्न आहेत. गेल्या सात ते आठ महिन्यांत सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. एवढे धाडसी, जलद निर्णय घेणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली येथे व्यक्त केला.

गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवलीत आयोजित नववर्ष स्वागत यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. या वेळी डोंबिवलीकरांना नववर्षाच्या शुभेच्छा देताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. दहा वर्षांपूर्वी डोंबिवलीत आबासाहेब पटवारी असताना येथील शोभायात्रेत मी सहभागी झालो होतो. हे नवीन वर्ष सर्वांना सुखसमाधानाचे, आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी दिल्या. डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी असून सामाजिक, धार्मिक, साहित्यिक असे अनेक रत्ने या डोंबिवलीकरांनी राज्याला दिली आहेत. डोंबिवलीत शोभायात्रेची सुरुवात झाली आणि त्याचे अनुकरण सगळीकडे झाले हा इतिहास आहे. कोरोना कालखंडानंतर राज्याच्या सर्वांगीण विकासाबरोबरच सांस्कृतिक सण-उत्सव, परंपरा जोपासली गेली पाहीजे. यासाठी हे सण-उत्सव आवश्यक आहेत असे शिंदे यांनी सांगितले.
डोंबिवलीकरांचा उत्साह आणि प्रेम पाहून मुख्यमंत्री शिंदे यांना आपले पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीची आठवण झाली. खासदार शिंदे यांची सुरुवातीची निवडणूक पाहता त्यांना जे काही प्रेम दिले आहे ते मी कधीही विसरू शकत नाही. आमदार, खासदारांच्या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी डोंबिवलीकर खंबीरपणे उभे आहेत, त्यामुळे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो असे त्यांनी या वेळी सांगितले.

हिंदू हित की बात करेगा, वही राज्य पे राज करेगा : मंत्री रवींद्र चव्हाण
२५ वर्षे अगोदर या शहरात हिंदू सणांच्या निमित्ताने हिंदू नववर्ष स्वागतयात्रा सुरू झाली पाहिजे, या विचारांतून संघाच्या माध्यमातून जो संकल्प केला गेला, तोच संकल्प आज करणे आवश्यक असल्याचे मत या वेळी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा त्याचप्रमाणे जो हिंदू हित की बात करेंगे वही महाराष्ट्र मे राज करेंगे हे या माध्यमातून सांगायचे असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com