
कांदिवलीत महेश कोठारेंची उपस्थिती
अंधेरी, ता. २२ (बातमीदार) ः गुढीपाडव्यानिमित्त कांदिवली समता नगर पूर्व येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेला ढोल ताशांच्या गजरामध्ये सुरुवात झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांची उपस्थिती होती.
या शोभायात्रेत मुंबईतली नावाजलेली ढोल पथके सहभागी झाली होती. बोरिवली ढोल ताशा ध्वज पथक, मोरया ढोल ताशा पथक , जगदंब ढोल ताशा पथक या ढोल ताशा पथकांच्या आवाजात लोक मंत्रमुग्ध झाले. यात वेगवेगेळे देखावे सादर करण्यात आले. पारंपरिक वेशात तरूण वर्ग या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. कांदिवली पूर्व येथील पुष्टीपती गणेश मंदिरात आरतीने या शोभायात्रेची सांगता झाली. येथील नगरेविका माधुरी योगेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना शाखा क्र. २५ व २६ यांच्या वतीने संयुक्तरित्या गुढीपाडव्याचा सण साजरा झाला. या कार्यक्रमाला महेश कोठारे यांच्यासह आमदार विलास पोतनीस उपस्थित होते.