
भिवंडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपीस अटक
वज्रेश्वरी, ता. २२ (बातमीदार) : गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला कोनगाव पोलिसांनी सापळा रचत सोमवारी अटक केली आहे. मोहम्मद हुसेन मुनव्वर शेख ऊर्फ अण्णा (वय ३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भिवंडीत अवैध गुटखा व गांजा विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी अवैध धंदे करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे निर्देश शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना दिले होते. यानंतर पोलिस यंत्रणा सक्रिय झाली असून कोनगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील व पोलिस हवालदार अरविंद गोरले यांना कोणगाव पुलाखाली एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दीप बने यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचत मोहम्मद हुसेन यांच्याकडून १ किलो ५०० ग्राम वजनाचा ३० हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करत त्यास अटक केली आहे.