
भारतीय शेअर बाजारात किंचिंत वाढ
मुंबई, ता. २२ : अमेरिकी फेडरल बँकेच्या व्याज दरवाढीच्या निर्णयाची वाट पाहणाऱ्या भारतीय शेअर बाजारांना आज पाव टक्क्यांपेक्षा जास्त तेजी दाखवता आली नाही. आज सेन्सेक्स १३९.९१ अंश; तर निफ्टी ४४.४० अंशांनी वाढला.
अमेरिका आणि युरोपमधील बँका बुडण्याच्या घटना संपल्या या अपेक्षेत आज खरेदी करण्यात आली. त्यातच अमेरिकी फेडरल बँक व्याज दरवाढ करेल, ही अपेक्षाही सर्वांनी जमेस धरली होती. त्यामुळे आज बाजाराची चाल वर-खाली होत असली, तरी ती एकंदरीत थंडच होती. निफ्टी जेमतेम शंभर अंशांच्या पट्ट्यात; तर सेन्सेक्स ४०० अंशांच्या पट्ट्यात वरखाली फिरत होता. सेन्सेक्सने ५८ हजारांचा; तर निफ्टीने सतरा हजारांचा स्तर टिकवून ठेवला. दिवसाअखेरीस सेन्सेक्स ५८,२१४.५९ अंशावर निफ्टी १७,१५१.९० अंशावर स्थिरावला.
आज धातूनिर्मिती क्षेत्र, बांधकाम व्यवसाय आणि ग्राहकोपयोगी कंपन्यांचे क्षेत्र मंदीत होते; तर बँका, औषधनिर्मिती कंपन्या आणि वाहननिर्मिती कंपन्यांचे शेअर तेजीत होते. इमामीचे संचालक मंडळ शेअरची पुनर्खरेदी करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेणार असल्याच्या बातमीमुळे या शेअरचे भाव आठ टक्क्यांच्या आसपास वाढले होते. निफ्टीमधील एचडीएफसी लाईफ, बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व्ह, सन फार्मा, टाटा कंझ्युमर या शेअरचे भाव वाढले; तर निफ्टीमध्ये ॲक्सिस बँक, अदाणी पोर्टस, बीपीसीएल, कोल इंडिया या शेअरचे भाव कमी झाले. सेन्सेक्सवरील इंडसइंड बँक, टाटा मोटर, टीसीएस, आयसीआयसीआय बँक या शेअरचे भाव वाढले.
कोट
..........
अमेरिका व युरोपमधील बँका आता सुरळीत चालतील, या अपेक्षेत आज खरेदी झाली. अमेरिकी फेडरल बँकेची पाव टक्के किंवा त्यापेक्षा कमी व्याज दरवाढ झाली तर तेजी येऊ शकते.
- विनोद नायर, जिओजीत फायनान्शिअल सर्व्हिसेस.