
नैनाबद्दलचे गैरसमज दूर करा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता.२२ ः नैना प्राधिकरण जर जनतेच्या हिताचा आहे, तर सरकारने सिडकोच्या माध्यमातून पुढे येऊन नैनाबाबत लोकांच्या मनातील गैरसमज दूर करावेत, अशी मागणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरात लवकर बैठक घ्यावी, अशी मागणीही प्रशांत ठाकूर यांनी केली. तसेच विरोधकांकडून नैनाबद्दल चुकीची माहिती देऊन ग्रामस्थांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
२०१३ ला नैनाची स्थापना झाली. तेव्हा जो विकास व्हायला हवा होता. तो करण्यात प्रशासनाला काहीअंशी वेळ लागला. त्यामुळे छोट्या टीपी स्कीम आणल्या गेल्या आहेत. यासंदर्भामध्ये स्थानिक लोकांचा काही मुद्यांवर विरोध निर्माण झाल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. लोकांनी सिडकोला जमिनी दिल्यानंतर सिडको ६० टक्के त्यांच्याकडे ठेवेल आणि लोकांना फक्त ४० टक्के जमीन देईल याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. सिडकोच्या माध्यमातून ग्रामस्थांना जी ४० टक्के जमीन दिली जाणार आहे. त्या ४० टक्के जमिनीचा विकास केला जाणार आहे. विकास केलेल्या या जमिनीवरती रस्ते गटार यासारख्या सुविधा दिल्या जाणार आहेत. अडीच पट एफएसआय दिला जाणार आहे. ज्या ठिकाणी पॉईंट २ एफएसआय मिळाला तो पूर्ण एक एफएसआय ४० टक्के क्षेत्रातच मिळेल. प्लस त्याला त्याच्या जमिनीचा विकास होईल. ही बाब अद्याप शेतकऱ्यांना समजावण्यात आली असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. मात्र याआधी जे पक्ष सत्तेत होते. आता त्या पक्षातील मंडळींकडून विरोधात बोलून मोर्चे काढून, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार सुरु असल्याचे सभागृहासमोर सांगितले.