
पडघ्यात बोहाडा यात्रेचा उत्साह
पडघा, ता. २३ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या पडघा येथील बोहाडा यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुढीपाडव्याला भरणाऱ्या बोहाडा यात्रेत देव-देवतांचे मुखवटे परिधान करून रात्रभर वाद्यवृंदाच्या तालावर सोंगे नाचवली जातात. ही सोंगे पाहण्यासाठी व विविध आकाशपाळणे, छोटे पाळणे यांची मजा घेण्यासाठी तसेच रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या स्टॉलवर खरेदीसाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी तुंडुब गर्दी केली होती. या यात्रेची सुरुवात शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांच्या हस्ते कान्होबा मंदिरात पुष्पहार अर्पण करून करण्यात आली; तर सरपंच अमोल बिडवी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य रस्त्यावर लाईट व्यवस्था, रस्ते नाकाबंदी व गर्दीत नारिकांना सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपकाची व्यवस्था करण्यात आली होती. बोहाडा यात्रेची सांगता दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. २३) सकाळी गावदेवीचे सोंग गावभर नाचवून करण्यात आली. कोणतारी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पडघा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय साबळे यांच्यासह त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.