मानसिक तणावातून हल्ला; दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानसिक तणावातून हल्ला; दोघांचा मृत्यू
मानसिक तणावातून हल्ला; दोघांचा मृत्यू

मानसिक तणावातून हल्ला; दोघांचा मृत्यू

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : मानसिक ताणावातून एका व्यक्तीने तब्बल ५ जणांवर केलेल्या चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू; तर तिघे जखमी झाल्याची घटना ग्रँट रोड परिसरात आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. जयेंद्र मेस्त्री आणि नीला मेस्त्री अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. याप्रकरणी हल्लेखोर चेतन गाला (५४) याला डी. बी. मार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेतील जखमींना एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल तसेच नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

डी. बी. मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत पार्वती मेन्शन इमारतीमध्ये चेतन गालाने शुक्रवारी (ता. २४) दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास चाकूने शेजारी राहणाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. या घटनची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गालाला अटक केली. स्वतःचे कुटुंब सोडून गेल्यामुळे मानसिक तणावातून आणि रागाच्या भरात त्याने हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. त्याने ज्या व्यक्तींवर हल्ला केला त्यांच्यामुळेच स्वतःचे कुटुंब सोडून गेले या विचारानेच त्याने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. डी. बी. मार्ग पोलिसांनी चेतन गालाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

कौटुंबीक वादातून हल्ला
चेतन गालाचे कुटुंबीय त्याच्याशी असलेल्या वादामुळे दूर झाले होते. यामागे त्याच्या शेजाऱ्यांनी कुटुंबीयांना भडकवल्याचा संशय चेतनच्या मनात होता. त्याच कारणाने तो मानसिक तणावात होता. याच रागातून त्याने शेजारील मेस्त्री यांच्या घरात जाऊन चाकूने हल्ला केला. या घटनेत जयेंद्र मेस्त्री आणि नीला मेस्त्री या दोघांचा मृत्यू झाला.