मुंबादेवीच्या भक्तांना ‘पसायदान’कडून पाणी वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबादेवीच्या भक्तांना ‘पसायदान’कडून पाणी वाटप
मुंबादेवीच्या भक्तांना ‘पसायदान’कडून पाणी वाटप

मुंबादेवीच्या भक्तांना ‘पसायदान’कडून पाणी वाटप

sakal_logo
By

मुंबादेवी, ता. २७ (बातमीदार) ः गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीस प्रारंभ झाला आहे. रविवारी या निमित्ताने मुंबादेवी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. त्‍यांना उन्‍हाचा त्रास होऊ नये यासाठी थंड पाण्याची व्यवस्था ‘पसायदान’ संस्थेतर्फे करण्यात आली होती. या सेवेचा लाभ घेत भाविकांनी आणि मुंबादेवी मंदिराचे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी आभार व्यक्त केले. जवळपास दीड हजार भाविकांनी या सेवेचा लाभ घेतल्याचे पसायदान मंडळाचे अध्यक्ष मनोज अमरे यांनी सांगितले. प्रिती अमरे, अनघा पेढे, स्मिता माने, वनिता तोंडवलकर, आज्ञा सोनावणे आदींनी भाविकांना पाण्याचे वितरण केले. चैत्र नवरात्रीनिमित्त आलेल्‍या भाविक वैष्णवी नारकर यांनी या सेवेबद्दल आभार व्‍यक्‍त केले.

तनिष्का वेल्हाळने मिळवले रौप्यपदक
घाटकोपर, ता. २७ (बातमीदार) ः राष्ट्रीय सब ज्युनिअर पूमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप स्‍पर्धेत महाराष्ट्रातून तनिष्का वेल्हाळ हिने वैयक्तिक गटामध्ये रौप्यपदक पटकावले आहे. ३६ वी राष्ट्रीय सब ज्युनिअर क्युरोगी आणि ११ वी राष्ट्रीय सब ज्युनिअर पूमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप ओडिसा कट्टक येथे २५ ते २७ मार्चदरम्‍यान पार पडली. या स्पर्धेत तनिष्का वेल्हाळ हिने पूमसे प्रकारात उत्तम प्रदर्शन दाखवत रौप्यपदक मिळवले. या स्पर्धेसाठी तनिष्काचा गेले कित्येक महिने सिद्धकला तायक्वांदो अकादमीच्या प्रशिक्षण केंद्रात सराव सुरू होता. तिच्‍या कामगिरीचे महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश बारगजे, सचिव मिलिंद पाठारे, विजय कांबळे, सिद्धकला अकादमीचे मास्टर जयेश वेल्हाळ यांनी अभिनंदन केले आहे.

‘वादळवाट’ची इंग्रजी आवृत्ती लवकरच
मुलुंड, ता. २७ (बातमीदार) ः जागतिक स्तरावरील पोएंट चॉईज अॅण्ड फ्री स्पीरिट एलएलसीच्या वतीने प्रकाशक अक्षय सोन्थालिया यांनी मुंबईत नुकतेच ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध साहित्यिका इ-इथक्तिसन यांचे अॅक्ट द गोईंग डाऊन ऑफ द सन हे व्यक्तिचरित्र कथासंग्रह व अॅडिन्ग कॅलर्स ऑफ लाईफ हे जागतिक स्तरावरील कवीचे कवितासंग्रह नुकतेच प्रकाशित केले. या प्रसंगी पोएंट चॉईज अॅण्ड फ्री स्पीरिट एलएलसी प्रकाशक अक्षय सोन्थालिया यांनी घोषणा केली की, रमेश खानविलकर यांच्या जीवनावर महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड यांनी ‘वादळवाट’ नावाचे जे पुस्तक लिहिले आहे. त्या ‘वादळवाट’चे इंग्रजीमध्ये रूपांतर करण्यासाठी आर. एम. भास्कर यांना देऊन ‘वादळवाट’ची इंग्रजी आवृत्ती सात राष्ट्रांमध्ये एकाच वेळी प्रकाशित केली जाईल. ‘वादळवाट’ हे पुस्‍तक इंग्रजीत आल्यावर जागतिक स्तरावर त्याच्या व्यक्तिरेखेची ओळख होऊन अनेकांना प्रेरणा घेता येईल, असे प्रतिपादन सोन्थालिया यांनी या वेळी केले.

ज्येष्ठ नागरिक असोसिएशनचा दशकपूर्ती सोहळा
घाटकोपर, ता. २७ (बातमीदार) ः पश्चिम येथील अमृत पार्क ज्येष्ठ नागरिक असोसिएशनच्या सदस्यांनी दशकपूर्ती सोहळा व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या स्वामी मठातील आगमनाचा सातवा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा केला. या सोहळ्यात ७५ वर्षे पूर्ण करणारे ज्येष्ठ नागरिक व लग्नाची ५० वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांचा सन्मानपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी शिवाजी फुलसुंदर यांच्या हस्‍ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला असोसिएशनचे अध्यक्ष इस्माईल पटेल, सरचिटणीस रवींद्र पाचपुते, गोरखनाथ गोसावी, श्री स्वामी समर्थ केंद्राच्या संस्थापिका शैला पाचपुते, असल्फा स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती ध्यैर्यशील दादा शितोळे, जुन्नर मठाचे मठाधिपती सुनील दादा शिंगोटे, जालिंदर शेटे, जयश्री देसाई आदी उपस्थित होते.

दादरमध्‍ये साई उत्‍सव
मुंबई ः ॐ साई सेवा मंडळातर्फे रामनवमीनिमित्त बुधवारी (ता. २९) सायंकाळी ५.३० वाजता हळदी-कुंकू समारंभ व सायंकाळी सात वाजता साई पालखी सोहळा; तसेच गुरुवारी (ता. ३०) सकाळी ९.१५ वाजता होम हवन, दुपारी ३.१५ वाजता श्री सत्‍यनारायण महापूजा व सायंकाळी ७.३० वाजता साई भंडारा आयोजित केला आहे. नायगाव येथील शिवसेना मध्‍यवर्ती कार्यालयाजवळील २३२ सामंत चाळ येथे हे कार्यक्रम होणार आहेत. या वेळी भाविकांनी मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे, असे आवाहन मंडळाचे अध्‍यक्ष राकेश देशमुख, कार्याध्‍यक्ष विजय वायगणकर, राजन तरे, विशाल कदम यांनी केले आहे.

न्यूबर्गतर्फे मुंबईत आधुनिक प्रयोगशाळा
प्रभादेवी, ता. २७ (बातमीदार) : सुलभ तपासणी, तसेच नागरिकांना उपयुक्त सुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून भारतातील प्रसिद्ध न्यूबर्ग डायग्नोस्टिकच्या वतीने मुंबईत दहिसर, चेंबूर आणि विद्याविहार या तीन ठिकाणी प्रयोगशाळा आणि ऑन्कोपॅथॉलॉजी केंद्र उघडणार असल्याची घोषणा करण्यात आली. परेल येथे झालेल्या कार्यक्रमात न्यूबर्ग डायग्नोस्टिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. जी.एस.के. वेळू, डॉ. अजय शहा, डॉ. राजेश बेंद्रे, डॉ. जय मेहता यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. या प्रयोगशाळांमध्‍ये सहा हजारांहून अधिक प्रकारच्‍या नियमित तपासण्या करण्याची सोय असून, याचा फायदा मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांनाही होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
प्रभादेवी (बातमीदार) : दादर येथील महाराष्ट्र हायस्कूलच्या १९९०-९१ मधील दहावीतील (दुपारचे वर्ग) माजी विद्यार्थी व शिक्षकांचे स्नेहसंमेलन शाळेतील सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. ७ मे रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी संबंधित माजी विद्यार्थ्यांनी जितेंद्र चव्हाण यांच्याशी ९८२१३१२१२५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुलुंडमध्ये आरोग्य विषयावर व्याख्यान
मुलुंड, ता. २७ (बातमीदार) ः महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड यांच्या आरोग्य विभागातर्फे मुलुंडकरांसाठी व विशेषतः ज्‍येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. पाठीच्या कण्याचे आजार व त्यावरील उपचार या विषयातील तज्‍ज्ञ डॉ. शेखर भोजराज हे नागरिकांना सादरीकरणासह मार्गदर्शन करणार आहेत. हे व्याख्यान शनिवारी (ता. १) संध्याकाळी सहा वाजता सेवा संघाच्या सु. ल. गद्रे सभागृहामध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून सर्व मुलुंडकरांनी त्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.