कांदिवलीत रिक्षाचालकांनी मुजोरी

कांदिवलीत रिक्षाचालकांनी मुजोरी

कांदिवली, ता. १० (बातमीदार) ः कांदिवलीमध्‍ये रिक्षाचालकांच्‍या मुजोरीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेष करून रेल्‍वे स्‍थानक परिसरात प्रवाशांना ये-जा करणेही या रिक्षाचालकांमुळे कठीण होत आहे. याकडे वाहतूक पोलिसही दुर्लक्ष करत असल्‍याने नागरिकांनी संताप व्‍यक्‍त केला आहे.
कांदिवली रेल्‍वे स्‍थानकाच्‍या पश्चिम भागात प्रवाशांसाठी तीन मार्ग आहेत. या मार्गांवर बेशिस्त रिक्षाचालक भाडे मिळण्याकरिता मध्येच रिक्षा उभ्या करतात. यामुळे दररोज हजारो प्रवाशांना येथून प्रवास करणे कठीण जात आहे. या उभ्या असलेल्या रिक्षाच्या मधूनच मार्ग काढताना वेळेत स्‍थानकात पोहोचणेही कधी कधी अशक्‍य होत असल्‍याचे प्रवाशांचे म्‍हणणे आहे.
कांदिवली पश्चिमेला प्रचंड लोकवस्ती आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. हजारो प्रवाशांची पहाटेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत गर्दी असते. रेल्‍वे स्‍थानकाला ये-जा करण्यासाठी तीन अरुंद मार्ग आहेत. यामुळे प्रवाशांना धक्काबुक्की करतच प्रवास करावा लागत आहे. विशेष करून याचा त्रास ज्‍येष्‍ठ नागरिक व महिलांना होत आहे. त्‍यामुळे येथील रिक्षाचालकांवर त्‍वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दादागिरी वाढली
रेल्‍वे स्‍थानकाला लागून असलेल्या अरुंद मार्गावर रिक्षचालकांची दादागिरी वाढली आहे. बेशिस्त रिक्षाचालक वाहतुकीच्‍या नियमांचे उल्‍लंघन करत आहेत. तसेच भाडे मिळवण्याकरिता कांदिवली पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या पायाऱ्यांजवळच रिक्षा उभ्या करत असल्‍यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. धावपळीच्या वेळेत मार्गावरच उभ्या असलेल्या रिक्षांच्या कोंडीतून मार्ग काढताना बऱ्याचदा वाद होतात. याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने, प्रवासी हतबल झाले आहेत. बेशिस्त रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

रिक्षचालकांची मुजोरी वाढत आहे. अनेकदा अव्‍वाच्‍या सव्‍वा भाडे आकारले जात आहे. तसेच अनेकदा येथून ये-जा करण्यासाठी जागा मिळत नसल्‍याने ते प्रवाशांशी वाद घालतात. या बेशिस्त रिक्षाचालकांना पोलिसांची भीती राहिली नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
- आदिनाथ हेंद्रे, प्रवासी

पोलिसांची करवाई सुरूच असते. हे रिक्षाचालक पोलिसांची गाडी पाहताच पळापळ करतात. या बेशिस्त रिक्षाचालकांवरील कारवाई अधिक तीव्र केली जाईल.
- संतोष पाटील, वाहतूक पोलिस अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com