दृष्‍टीक्षेप

दृष्‍टीक्षेप

पोलिसांसाठी सीपीआरचे प्रात्यक्षिक
जोगेश्वरी, ता. १० (बातमीदार) ः सांताक्रूझ पोलिस ठाण्यातील हवालदार सुजित पवार यांचे १७ मार्चला कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले होते. त्‍यांच्‍या परिवाराला आर्थिक मदत मिळावी यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी पुढाकार घेऊन सर्व अधिकारी व अंमलदार यांना मदत निधी जमा करण्याचे आवाहन केल्‍यानंतर फक्त सांताक्रूझ पोलिस ठाण्याचे अधिकारी अंमलदाराकडून सहा लाख रुपये मदत निधी जमा झाला. तो सुजित पवार यांच्‍या पत्नी रेणुका पवार यांना नुकताच सन्मानपूर्वक देण्यात आला. तसेच सुजित पवार यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाल्याने पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्यात जागरुकता आणण्यासाठी हृदयरोगतज्‍ज्ञ डॉक्टर सोने व रोटरी क्लब यांच्या मदतीने ‘सीपीआर’चे प्रात्‍यक्षिक दाखवून मार्गदर्शन देण्यात आले.

रोटरी क्लबतर्फे ‘लिव्हिंग विल’ शिबिर
कांदिवली, ता. १० (बातमीदार) ः रोटरी क्लब ऑफ बोरिवलीच्या वतीने ‘लिव्हिंग विल’ (वैद्यकीय इच्छापत्र) बाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कमला विहार स्पोर्टस् क्लबच्या सभागृहात के. व्ही. प्रेमराज यांनी आयोजित केलेल्या शिबिराला खासदार गोपाळ शेट्टी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रोफेसर डॉ. नितीन दातार यांनी ‘लिव्हिंग विल’बाबत संपूर्ण बारकावे सांगितले. उपनगरातील विविध मान्यवर, ज्येष्ठ नागरिक यांनी यामध्‍ये सहभाग घेतला होता. प्रश्नोत्तरांमधून अनेक समस्यांवर या वेळी चर्चा झाली.

शास्त्री नगरमध्‍ये सुशोभीकरण
गोरेगाव, ता. १० (बातमीदार) : गोरेगाव पश्चिम येथील शास्त्रीनगरचे स्थानिक रहिवासी बऱ्याच वर्षांपासून रस्ते सुशोभीकरणाची मागणी करीत होते. या मागणीची अखेर दखल घेण्यात आली आहे. रविवारी (ता. ९) सकाळी साडेअकरा वाजता शास्त्रीनगर येथील मोकळ्या जागेचे सुशोभीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी स्थानिक रहिवासी व भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष व माजी नगरसेवक हर्ष भार्गव पटेल उपस्थित होते. सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन
चेंबूर, ता. १० (बातमीदार) ः बेस्ट समिती अध्यक्ष, माजी शिवसेना नगरसेवक अनिल पाटणकर व मुंबई पालिका रस्ता विभाग यांच्या वतीने वैभव नगर येथील रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी आमदार प्रकाश फातर्फेकर, महिला उपविभाग संघटिका सुलभा पात्याने, माजी नगरसेविका मीनाक्षी पाटणकर, युवा सेना पदाधिकारी यांच्‍यासह स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मालवणीतील मंदिरात रोजा इफ्तार
मालाड, ता. १० (बातमीदार) ः मालवणीमध्ये ‘हम सब एक हैं’ या राष्ट्रीय एकात्मतेचे जिवंत चित्र साई सावली मंदिरात दिसून आले. मालवणीतील या मंदिरात रमजान महिन्यानिमित्त ‌सर्वधर्म समभाव, बंधुभाव, सामाजिक ऐक्य आणि सद्‍भावना याचे प्रतीक असलेले रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला इरफान शेख, मीर आसिफ अली, पराग कामांत, संतोष तायडे यांच्‍यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

गोरेगावात शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिर
गोरेगाव, ता. १० (बातमीदार) : शिवसेना उद्धव बाळासाहेब शाखा क्रमांक ५६ तर्फे गोरेगाव पश्चिम मधील महाराष्ट्र विद्यालय सभागृह येथे रक्तदान शिबिर भरवण्यात आले होते. सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत ३०५ पेक्षा अधिक लोकांनी उत्साहात सहभाग घेत रक्तदान केले. या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, अमोल कीर्तीकर, दीपक सुर्वे यांच्‍यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपास्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com