कोविडमुळ‍े निर्बंधांचे सावट

कोविडमुळ‍े निर्बंधांचे सावट

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. १० ः गेल्या काही दिवसांपासून शहरात कोविडच्या रुग्णांनी पुन्हा डोके वर काढल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत कोविड चाचण्यांवर भर देण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. तसेच वेळ पडल्यास नियम मोडणाऱ्यांवर कारवाईच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे कोविड रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा एकदा कोविड निर्बंध लागण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त राजेश नार्वेकर यांनी, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या उपस्थितीत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, तसेच सर्व रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, मुख्यालय स्तरावरील वैद्यकीय अधिकारी व सर्व २३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करीत कोरोनास्थितीचा गुरुवारी (ता. ६) विभागनिहाय बारकाईने आढावा घेतला. यामध्ये आयुक्तांनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आढावा घेण्यात आला. त्यांच्या कार्यक्षेत्रात होत असलेल्या टेस्टिंग व त्यामधील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण या आकडेवारीचे बारकाईने निरीक्षण केले. नागरी आरोग्य केंद्रांवर, तसेच महापालिका रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या आयएलआर व सारी रुग्णांची कटाक्षाने कोविड टेस्टिंग करण्याचे निर्देश नार्वेकर यांनी दिले. चाचण्यांच्या प्रमाणात वाढ करण्याच्या सूचना देतानाच शासन निर्देशानुसार ६० टक्के आरटीपीसीआर टेस्ट्स व ४० टक्के अँटिजेन टेस्ट्स हे प्रमाण राखण्याची काळजी घेण्याच्या सूचना नार्वेकर यांनी दिल्या आहेत.
--------------------------------
रुग्णांच्या विलगीकरणावर भर
महापालिकेच्या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांवरील उपचार करण्याचे निर्देश आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले. तसेच सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना सात दिवस गृहविलगीकरणात ठेवा; परंतु गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून आल्यास रुग्णांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या.
--------------------------------
खासगी रुग्णालयांवर करडी नजर
नवी मुंबई महापालिका रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रे येथील ओपीडीप्रमाणेच कार्यक्षेत्रातील खासगी डॉक्टरांच्या ओपीडीवरही महापालिकेच्या स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत लक्ष ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यांच्याकडून रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आलेल्या रुग्णांच्या स्थितीवरही बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.
--------------------------------
कोविडसाठी खाटा आरक्षित
महापालिकेच्या वाशी, ऐरोली, नेरूळ येथील तिन्ही सार्वजनिक रुग्णालयांच्या ठिकाणी कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी एकूण ५० बेड्सची सुविधा कोविड रुग्णांवरील उपचारासाठी सद्यस्थितीत कार्यान्वित आहे. तसेच वाढत्या रुग्णसंख्येची व्याप्ती पाहता सर्व रुग्णालये सुसज्ज असल्याची खात्री करून घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.
---------------------------------
वाशी एक्झिबिशन केंद्र सुरू करणार
शहरात कोविडच्या रुग्णांची संख्या वाढल्यास गरजेला वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमधील अतिदक्षता विभाग सुसज्ज ठेवण्याच्या सूचना महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. या कक्षात ७५ बेड्स सर्व अत्यावश्यक सुविधांनी सुसज्ज असल्याची पडताळणी करण्यात आली आहे.
----------------------------------
कोविडची रुग्णवाढ लक्षात घेता नागरिकांनी घाबरू जाऊ नये. स्वत:चे तसेच आपल्या संपर्कात येणाऱ्या कुटुंबीय व मित्र, सहकारी, परिवाराचे आरोग्याच्या दृष्टीने सर्दी, ताप, खोकला अथवा कोविड सदृश्य लक्षणे आढळल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा.
- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com