शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे पाप!

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे पाप!

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १० : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण पाचपटीने वाढले. याला जबाबदार कोण, असा सवाल करीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकारने केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राज्यात २१ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहितीही त्यांनी दिली.

ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले ठाण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
या बैठकीला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच इतर नेते उपस्थित होते.

शेतकरी भाजपसाठी महत्त्वाचा भाग राहिलेला नाही. शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन ते सत्तेत आले; पण त्यांनी शेतकऱ्यांना बरबाद केले, अशी टीकाही पटोले यांनी केली. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, त्यांना न्याय देण्यासाठी काँग्रेस पाठीशी उभी असल्याचेदेखील पटोले यांनी या वेळी स्पष्ट केले. जर मोदी सरकार राहिल्यास ते देशाला भिकारी केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही करत पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला.

मराठा आरक्षणासाठी चर्चा करा : चव्हाण
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, की आम्ही आजही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत. यावर न्यायालयात राज्य सरकारच्या वकिलाने व्यवस्थित युक्तिवाद केला तर ही समस्या सुटेल. त्याकरिता मुख्यमंत्र्यांनी वकिलांशी चर्चा करावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

काँग्रेसचाही अयोध्या मंदिरावर अधिकार!
अयोध्येमधील महंत यांनी काँग्रेसवासीयांनाही निमंत्रण दिले आहे. त्यामुळे आम्हीही तेथे जाणार आहेत, कारण या मंदिराचे भूमिपूजन दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केल्याची आठवण करून देताना अयोध्येतील मंदिरावर जास्त अधिकार काँग्रेसचा असल्याचेही नाना पटोले यांनी या वेळी सांगितले.

ठाण्यातही काँग्रेसचे आमदार-खासदार दिसतील
ठाणे जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पूर्वीप्रमाणे काँग्रेस पुन्हा ताकदीने उभी राहील, त्यादृष्टीने कामाला लागा, असे आवाहन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे. भविष्यात ठाणे जिल्ह्यात काँग्रेसचे आमदार आणि खासदार दिसतील, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.

बैठकीत झालेले ठराव
- मोदी-अदाणी महाघोटाळ्यावरून राहुल गांधींच्या पाठीशी
- राहुल गांधी यांच्यावरील कारवाईविरोधात जय भारत सत्याग्रह
- शेतमालाला योग्य भाव, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com