सार्वजनिक रुग्णालयांत कोविड माॅक ड्रिल

सार्वजनिक रुग्णालयांत कोविड माॅक ड्रिल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : देशात कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर सरकारी तसेच खासगी रुग्णालयांतील यंत्रणा कितपत सज्ज आहेत, याची पाहणी करण्यासाठी देशव्यापी मॉक ड्रील सोमवारी घेण्यात आले. यात मुंबईतील पालिकेच्या सायन रुग्णालयासह राज्य शासनाच्या जे. जे. आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात मॉक ड्रिल केले.
रुग्णांना उपचार कसे द्यावेत, कोविडचे रुग्ण कोणत्या स्थितीत आहेत, हे कसे ओळखावे, डॉक्टरांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी, पीपीई किट कसे वापरावे यासह गंभीर रुग्णांना तातडीने उपचार देण्यासाठी कशी यंत्रणा राबवावी, स्वॅब कसा घ्यावा, व्हेंटिलेशन कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सध्या जे. जे. रुग्णालय समूहाअंतर्गतील सेंट जॉर्ज रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी ५० खाटांची स्वतंत्र सुविधा करण्यात आली आहे. या ५० पैकी १० आयसीयू आणि ४० सामान्य खाटा आहेत. या रुग्णालयात सध्या एकूण ९ रुग्ण दाखल असून यात ५ वयस्क आणि ४ बालरुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सेंट जॉर्ज रुग्णालयात १५० खाटांची सोय भविष्यात करता येईल. कोविड रुग्ण वाढलेच तर जीटी रुग्णालयात सोय केली जाईल. गरज पडल्यास जेजे रुग्णालयातही खाटा उपलब्ध होतील. चारही रुग्णालयांत चार हजारांपेक्षा जास्त खाटा आहेत, असे सर जे. जे. रुग्णालय समूहाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले. मॉक ड्रिलमुळे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दोन्ही मिळाले. रुग्णवाढीनंतर मॉक ड्रिल करणे शक्य नव्हते. त्यामुळे मॉक ड्रिलसाठी ही योग्य वेळ होती, असेही डॉ. सापळे म्हणाल्या.
...
सायन रुग्णालयही सज्ज
सायन रुग्णालयातदेखील मॉक ड्रिल पार पडले. रुग्णांची काळजी कशी घ्यावी तसेच तातडीचे उपचार देण्यासाठी डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी काय करावे, यासाठीचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक या वेळी दाखवण्यात आल्याची माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com