ध्यास ‘परिवर्तनशील’ समाज निर्मितीचा!

ध्यास ‘परिवर्तनशील’ समाज निर्मितीचा!

‘सामाजिक परिवर्तन’ ही संकल्पना तशी खूप व्‍यापक आहे. यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. पंजाबराव गवई या तरुणाने तीन दशकांपूर्वी हे स्वप्न पाहिले.
Summary

‘सामाजिक परिवर्तन’ ही संकल्पना तशी खूप व्‍यापक आहे. यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. पंजाबराव गवई या तरुणाने तीन दशकांपूर्वी हे स्वप्न पाहिले.

‘सामाजिक परिवर्तन’ ही संकल्पना तशी खूप व्‍यापक आहे. यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. पंजाबराव गवई या तरुणाने तीन दशकांपूर्वी हे स्वप्न पाहिले. आपण कांदिवली परिसरातील ज्या वस्तीत राहतोय त्या वस्तीचे, वस्तीतील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिक परिवर्तनाशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी ओळखले आणि हीच खूणगाठ मनाशी बांधत पंजाबराव यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने या परिवर्तनासाठी क्षेत्रे निश्चित करून कामाला सुरुवात केली. त्यातूनच ‘परिवर्तनशील’ संस्थेचा जन्म झाला.

कांदिवली, मालाड, गोरेगावपासून मुंबईतील अनेक वस्त्यांमध्ये पंजाबरावने ‘परिवर्तनशील’ संस्थेच्या माध्यमातून कार्याचा डोंगर उभा केला. शिक्षण, आर्थिक विकास, महिला सक्षमीकरण, बाल हक्क, स्वयंसहायता गट अशा प्रत्येक मुद्द्यावर पंजाबरावने परिवर्तनाच्या पताका फडकवण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे ही संस्था अनेकांसाठी एक हक्काचे ‘सामाजिक परिवर्तना’चे केंद्र बनले आहे.

पंजाबराव गवई हा एक सामान्य कुटुंबातील; पण ध्येयवेडा, हाडाचा चळवळीतील कार्यकर्ता आहे. तीन दशकांपूर्वी त्याने कांदिवलीतील विविध वस्त्यांमध्ये कामाला सुरुवात केली. अनेकांच्या हाकेला धावणारा म्हणून त्याची ख्याती निर्माण झाली. समाज बदलला तरच आपला विकास होईल, हे ओळखून समाजात बदलाव आणण्यासाठी काय करायला हवे, त्याविषयी ध्येय निश्चिती केले.

त्या ध्येयातूनच ‘परिवर्तनशील’ संस्था स्थापन झाली. प्रथम त्यांनी स्थानिक लोकांच्या प्रश्नांना हात घातला. वस्तीच्या स्वच्छतेपासून पाण्याची, शौचालयाची सुविधा निर्माण करणे, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड मिळवून देणे हे करतानाच नागरिकांमध्ये आपल्या ‘हक्क आणि अधिकारांची’ जाणीव निर्माण करण्यासाठी वस्ती पातळीवर अनेक छोटे छोटे मेळावे, प्रशिक्षण वर्ग घेतले. जनतेच्या सर्वांगीण विकासाच्या ज्या म्हणून शासकीय योजना आहेत, त्यांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळवून देण्यास त्यांनी सुरुवात केली.

अभ्‍यासिकेची सुरुवात
सामाजिक बदल शिक्षणातूनच घडवता येईल, हे लक्षात घेऊन संस्थेने शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित केले. मुलांची शाळेतील गळती रोखण्यासाठी त्यांना आवश्यक ती सर्व शैक्षणिक मदत देण्याबरोबरच संस्थेने गरीब, वंचित, कष्टकरी समाजातील मुलांसाठी एक अद्ययावत अभ्यासिका वर्ग सुरू केला. यामध्ये आठवीपासून पदवीपर्यंतची मुले आपल्या आयुष्याला दिशा देत आहेत. आजदेखील या अभ्यासिकेत सुमारे १०० विद्यार्थी आपले आयुष्य घडवीत आहेत.

स्पोकन इंग्लिश कार्यक्रम
परिवर्तनशील या संस्थेचा ‘स्पोकन इंग्लिश कार्यक्रम’ हा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम ठरला आहे. गेली बारा वर्षे हा उपक्रम संस्था राबवित आहे. इंग्रजी विषयाची भीती असणारी मुले, इंग्रजी न येणारी मुले अशा मुलांना सोबत घेऊन संस्थेने मुलांच्या मनातील इंग्रजीची नुसती भीतीच घालवली नाही तर त्यांना इंग्रजीत तरबेज केले. केवळ बारा वर्षात तब्बल सहा हजार मुलांना इंग्रजीत पारंगत केले. यातच संस्थेच्या कार्याची महती दडली आहे. त्याही पुढे जाऊन यातील तब्बल ३७०० युवकांना विविध क्षेत्रात नोकरी मिळवून देत त्यांना स्वतःच्या पायावर भक्कम उभे करून खऱ्या अर्थाने हजारोंच्या आयुष्यात यशस्वी आणि कायमस्वरूपी परिवर्तन घडवून आणले आहे.

महिलांचे स्वयम् सहायता गट
संस्थेचा सामाजिक परिवर्तनाच्या मार्गातील अजून एक यशस्वी उपक्रम म्‍हणजे महिलांचे स्वयम् सहायता गट. एका गटात दहा महिला असे १६३० महिलांचे १६३ ‘स्वयम् सहायता गट’ स्थापन करण्यात आले आणि हे मुंबई महानगरपालिके सोबत जोडून देण्यात आले. या माध्यमातून माता व बाल आरोग्यासाठी काम करताना संस्था तब्बल ४० हजार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. तसेच महिला व बालकांना कायदेशीर सेवा सुलभतेने मिळावी, याकरिता संस्था मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणासोबत काम करीत आहे. तसेच ‘सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल’ या जागतिक संस्थेबरोबर संस्था गेल्या आठ वर्षांपासून स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहे.

बाल संरक्षण समिती
अठरा वर्षांच्या आतील मुलांना अत्याचार, शोषण आणि गैरवर्तणुकीपासून संरक्षण देणे, सुरक्षितता निर्माण करणे, त्यासाठीची व्यवस्था, यंत्रणा आणि कृती आराखडे निर्माण करण्याच्या हेतूने संस्थेने राज्य आणि महापालिकेच्या सहकार्याने मालाड आणि कांदिवली परिसरातील आठ वॉर्डस्तरीय बाल संरक्षण समित्या स्थापन केल्‍या आहेत. या माध्‍यमातून त्यायोगे बालकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी काम सुरू केले आहे.

विविध उपक्रम
आर्थिक विकास योजनेअंतर्गत अनेक मुलींना संस्थेने टेलरिंग, ब्युटी पार्लर, नर्स आदींचे प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले आहे. याचबरोबर महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरण, नागरिक, पालक जागृती अभियानांतर्गत समुपदेशन कार्यशाळा, सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमांचे आयोजन, मूल्य शिक्षणाचे धडे देणे, मानवी हक्कांची जाणीव करून देणे आदी कार्यक्रमाचे आयोजन करणे, असे विविध उपक्रम राबवून संस्था खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तन घडवू पहात आहे.

स्वतःच्या समस्या स्वतः सोडवण्यासाठी तसेच सामाजिक परिवर्तनासाठी विशेष करून वंचित, दुर्बल, गरीब, कष्टकरी जनतेला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. ही गरज ओळखून गेली तीन दशके दर्जेदार शिक्षण, समुदायाचा सहभाग आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी परिवर्तनशील संस्था विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहे. परिवर्तनाच्या या चळवळीत समाजानेदेखील भरीव योगदान द्यावे, अशी अपेक्षा आहे.
– पंजाबराव गवई, सचिव, परिवर्तनशील संस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com