
तळोज्यात अवजड वाहनांची कोंडी
नवीन पनवेल, ता. २० (वार्ताहर)ः फुडलॅण्ड तळोजा पुलाच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे रेल्वे पुलावरील फुडलॅण्ड चौकातून एमआयडीसीकडे जाणारी एक मार्गिका वाहतुकीसाठी बंद असल्याने कळंबोलीकडून तळोजा औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची नावडे फाट्यावर कोंडी होत आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये जाण्यासाठी नावडे रेल्वे पुलावर पडत असलेला ताण लक्षात घेता कळंबोली स्टील मार्केट फुडलॅण्ड येथून एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी सिडकोने नवीन पूल बांधला आहे; परंतु सद्यस्थितीमध्ये या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे या पुलाला खड्डे पडले आहेत. त्यामुळे हे खड्डे बुजवण्यासाठी सिडकोने हाती घेतले आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये जाण्यासाठी फुडलॅण्ड चौक येथून सरळ पुढे नावडे पुलाचा वापर करावा, अशा सूचना वाहतूक पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
------------------------------------
पुलाच्या डागडुजीचे काम सुरू असल्याने एक मार्गिका बंद केली आहे. वाहतुकीचा ताण नावडे येथील चौकात येणार असून जागोजागी वाहतूक पोलिस तैनात करण्यात येणार आहेत.
- सुनील कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तळोजा वाहतूक शाखा