शिवडीत कमी दाबाने पाणीपुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवडीत कमी दाबाने पाणीपुरवठा
शिवडीत कमी दाबाने पाणीपुरवठा

शिवडीत कमी दाबाने पाणीपुरवठा

sakal_logo
By

विकतच्या पाण्यासाठीही शिवडीत झुंबड
३० टक्के पाणीकपातीमुळे रहिवासी हैराण

शिवडी, ता. २० (बातमीदार) ः शिवडी पश्चिमेतील बीडीडी चाळ, बारदेवी, गणेश नगर, शिवडी नाका, नाकवाची वाडी, गणेश बाग, तुळशी वाडी, गोलंजी हिल रोड इत्यादी भागांत वीस दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पाणी मिळविण्यासाठी रहिवाशांसह मुलांनाही पायपीट करावी लागत आहे. नोकरदार मंडळींना अनेकदा पाणी विकत घेऊन दैनंदिन कामे करावी लागत असल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली. काही ठिकाणी विकतचे पाणी घेण्यासाठीही रहिवाशांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. प्रशासनाने लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी रहिवाशांमधून जोर धरू लागली आहे.
वीस दिवसांपासून बीडीडी चाळ, बारदेवी, गणेश नगर, शिवडी नाका, नाकवाची वाडी, गणेश बाग, तुळशी वाडी, गोलंजी हिल रोड आदी लोकवस्त्यांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर्वीपासून शिवडी भागातील लोकवस्त्यांमध्ये दुपारी २ ते ५ अथवा सायंकाळी ५ ते ७ दरम्यान पाणी येते. मात्र, सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने साधारण एक ते दीड तासच पाणी मिळते. त्यातही एक हंडा भरण्यासाठी तीन ते पाच मिनिटे लागत असल्याने प्रतिव्यक्ती केवळ चार ते पाच हंडे पाणी मिळते. ते जेवण बनविण्यासाठी पुरते. इतर दैनंदिन कामासाठी लागणारे पाणी जवळपासच्या लोकवस्त्यांमधून पायपीट करीत मिळवावे लागत आहे. अनेकदा तर पाणी विकत घ्यावे लागत आहे.

मुलेही भरतात पाणी
शिवडी पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय राहतात. अनेक जण नोकरी-व्‍यवसायानिमित्त बाहेर असतात. मोठी मुले शाळा-महाविद्यालयात जातात. त्यामुळे पाणी भरण्यासाठी अनेकांच्या घरात कुणीच नसते. पाणी मिळवण्यासाठी जवळपासच्या लोकवस्त्यांमध्ये हंडे घेऊन फिरावे लागत आहे. सध्या लहान मुलांचा परीक्षेचा कालावधी जवळपास संपल्याने त्यांना सुटी आहे. सध्या पाण्यासाठी त्यांची ठिकठिकाणी पायपीट सुरू आहे.

पाणीकपात झाल्यापासून खूपच कमी दाबाने पुरवठा होत आहे. एक हंडा भरण्यासाठी तीन ते पाच मिनिटे लागतात. प्रत्येकालाच कमी प्रमाणात पाणी मिळत आहे. कामावर जाणारे पाणी येण्याच्या वेळेत उपलब्ध नसतील तर त्यांना ते मिळतच नाही. सध्या शाळेला सुटी असल्याने मुले घरात आहेत. त्यामुळे निदान स्वयंपाक व पिण्यासाठी पाणी मिळत आहे. इतर वापराचे पाणी तर विकतच घ्यावे लागत आहे.
- उमा वारंग, रहिवासी, गणेश नगर

घरातील नळाला २० दिवसांपासून केवळ १५ मिनिटे पाणी येते. त्यानंतर बाहेरील सार्वजनिक नळावरून पाणी भरावे लागते. कधी पाणी मिळते, तर कधी नाही. त्यामुळे काम-धंदा सोडून घरातील एका सदस्याला पाणी भरण्यासाठी घरीच थांबावे लागते. प्रशासनाने लवकर मार्ग काढून पाणी समस्या सोडवावी.
- कल्पना भवर, रहिवासी, बीडीडी चाळ

१५ टक्के कपात असली तरी वास्तविक पाहता शिवडीत २५ ते ३० टक्के कमी पाणी येत आहे. परिणामी अनेक भागांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक चाळधारक पाण्याचे टॅंकर मागवून दैनंदिन कामे करत आहेत. पिण्याच्या पाण्याचा टॅंकर तीन ते साडेतीन हजारांना घ्यावा लागत आहे. इतर वापरासाठीच्या पाण्याच्या टँकरसाठी एक ते दीड हजार रुपये मोजावे लागत आहेत. पिण्याच्या पाण्याचा टँकर पालिका जलाशयातून भरते. सध्या जलाशयातच पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्याचा टॅंकर भरणे कठीण होत आहे. त्यामुळे तो मिळविण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
- सचिन पडवळ, माजी नगरसेवक

शिवडीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी समस्या उद्‍भवल्याने टंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना मोठ्या काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागत आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे.
- राजेश राणे, वॉर्ड अध्‍यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस