महामार्गावर अवैध ढाब्यांचा सुळसुळाट

महामार्गावर अवैध ढाब्यांचा सुळसुळाट

बोईसर, ता. २२ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अवैध ढाब्यांना पालघर महसूल विभागाकडून अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी २७ मार्च २०२३ रोजी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. सात दिवसांत स्वत:हून अनधिकृत बांधकाम दूर न केल्यास तोडक कारवाईचा इशारा देण्यात आला होता; परंतु २० दिवस उलटूनदेखील अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघर तालुक्याच्या हद्दीतील वाडा खडकोना ते ढेकाळेपर्यंतच्या जवळपास ६२ ढाब्यांना पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांच्यामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मार्गाच्या दोन्ही बाजूला बिगर आदिवासी लोकांकडून मोठ्या संख्येने ढाबे बांधण्यात आले आहेत. यातील बरेच ढाबे हे स्थानिक आदिवासी व वन विभागाच्या जागेत अवैधपणे बांधण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांची कोणत्याही प्रकारची आवश्यक परवानगी न घेताच मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. यातील बऱ्याच ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून भोळ्याभाबड्या आदिवासींना फसवून तसेच त्यांना प्रलोभने दाखवत जमिनी बळकावण्यासाठी भूमाफिया आणि दलालांच्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत. त्याचबरोबर महामार्गाशेजारील वनविभागाच्या जमिनींवरदेखील अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे.


------------------------
ढाब्याच्या नावाखाली अवैध कामे
ट्रक, टँकर, ट्रेलर, टेम्पो आणि कंटेनर या अवजड वाहनांमधील डिझेल, बायोडिझेल, केमिकल, लोखंड, सळ्या, इतर भंगार साहित्य याच्यासह गुटखा, दारू आणि इतर मालाची तस्करी व चोरी केली जाते. विशेषतः मनोर पोलिस ठाण्‍याच्या हद्दीतील नांदगाव, आवढानी, चिल्हार आणि वाडा खडकोणा तसेच कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा गावातील ढाबे या अवैध धंद्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. गुजरात, राजस्थान आणि तारापूर औद्योगिक वसाहतीमधून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या या ढाब्यांवर थांबतात; मात्र रात्रीच्या अंधारात त्यातील डिझेल आणि बायोडिझेल ढाबा मालक आणि संघटित गुंडांच्या टोळीच्या मदतीने चोरी करून बाहेर काढले जाते. त्याचप्रमाणे ट्रक आणि टँकरमधील इतर मालाचीदेखील मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.

-------------------
अवैध ढाब्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस बंदोबस्तासाठी पोलिस ठाण्याची परवानगी घेतली आहे. पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाईला उशीर झाला आहे. पुढील आठवड्यात कारवाई केली जाईल.
- तहसीलदार, सुनील शिंदे, पालघर

-----------------
महामार्गावरील अवैध ढाबे काढून टाकण्यासाठी १८ एप्रिलची दिलेली मुदत संपलेली आहे. त्यामुळे कधीही तोडक कारवाई करण्यात येईल. पोलिस बंदोबस्तासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
- केशव तरंगे, निवासी नायब तहसीलदार, पालघर

------------------
सध्या काही सण-उत्सव, कार्यक्रम असल्याने पोलिस बंदोबस्त तिकडे तैनात करण्यात आला होता. महामार्गावरील अवैध ढाब्यांवर कारवाई करण्यासाठी सोमवारी (ता. २४) पोलिस बंदोबस्त देण्यात येईल.
- उमेश पाटील, पोलिस निरीक्षक, मनोर पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com