उन्हाळी भातशेती फुलोऱ्यात

उन्हाळी भातशेती फुलोऱ्यात

कासा, ता. २२ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील अनेक शेतकरी सूर्या प्रकल्पामधील धामणी व कवडास या धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून सिंचनासाठी सोडलेल्या पाण्यापासून भातशेतीची लागवड करतात. सध्या भाताची लोंबी जोमदार आली असून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. डहाणूसह वाडा तालुक्यात उन्हाळी भातशेती फुलोऱ्यात आल्यामुळे सर्वत्र हिरवे-पिवळे रंग दिसू लागले आहेत.
कासा, चारोटी, महालक्ष्मी, सारणी, तवा, सोनाळे, वाघाडी, वेती, रानशेत परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात उन्हाळी भातशेती बहरली आहे. दाणे भरून सुकल्यानंतर काही दिवसांत कापणीस सुरुवातदेखील केली जाणार आहे. मागील वर्षात कोरोनाचे संकट आल्याने अनेक शेतकरी आपल्या पावसाळीसह उन्हाळी भातशेतीकडे वळले होते. सध्या बाहेर मजुरी करण्यापेक्षा आपली शेती करण्यासाठी प्राधान्य देत आहेत. मागील काही वर्षांत अनेक शेतकरी शेतीकडे लक्ष देत नव्हते; पण उत्पादन चांगले मिळत असल्याने आणि रोजगार मिळत असल्याने आता अनेक शेतकरी शेतीमध्ये आवड जोपासत आहेत.

---------------
मेपर्यंत पाणी सोडणार
पावसाळ्यात लागवड केलेल्या शेतीपेक्षा उन्हाळी शेतीत चागले उत्पन्न मिळते. यावर कोणतेही अतिवृष्टी, रोगराई यांचे संकट येत नाही. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी या शेतीचा उपयोग होत आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने उत्तम प्रकारची बियाणेदेखील उपलब्ध होत आहेत. सूर्या कालव्याच्या पाण्यातून डहाणू परिसरातील दुबार भातपिके तयार झाली आहेत. काही दिवसात कापणीला सुरुवात होणार आहे. मेपर्यंत कालव्याला पाणी सोडले जाणार आहे, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

----------------
दोन वर्षांपूर्वी कोरोनाचे संकट आले होते. त्या वेळी दुसरे कोणतेही उत्पन्न, जोडधंदा करता येत नव्हता. त्यामुळे सध्या शेतीतून मिळणारे धान्य हाच आधार आहे. थोडाफार भाजीपाला लागवड करून जेमतेम उदरनिर्वाह सुरू आहे.
- राजेश सुतार, कासा शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com