ठाणेकरांनी साधला खरेदीचा अक्षय्य मुहूर्त

ठाणेकरांनी साधला खरेदीचा अक्षय्य मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : आमरस, खीर आणि पुरीवर दुपारी ताव मारल्यानंतर ठाणेकरांनी आज खरेदीचा अक्षय्य मुहूर्त साधला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयाला एक ग्रॅम वळ्यापासून ते दागिने खरेदी करण्यसाठी सराफा दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसली; तर दुसरीकडे यंदा पारा चाळिशीपार गेल्याने कुलर, एसी घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्येही ग्राहकांनी हजेरी लावली. जोडीला शिरखुरम्याचा आनंद लुटत रमजान ईदही ठाण्यात उत्साहात साजरी करण्यात आल्याने ठाण्यामध्ये हिंदू- मुस्लिम ऐकोप्याचे दर्शन घडले.
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. पण त्याच जोडीला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने सोने खरेदी करणेही शुभ मानले जाते. या मुहूर्तावर केलेली सोने खरेदी ‘अक्षय्य संचय’ मानली जाते. ठाणेकरांनीही ही परंपरा अबाधित ठेवली आहे. वास्तविक ठाणे म्हणजे आता सण- उत्सवांची पंढरी बनली आहे. त्यामुळे या दिवशी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कपड्यांपासून ते महागड्या गाड्या आणि इलेक्ट्रोनिक वस्तूंपासून ते आलिशान वास्तूंपर्यंत अनेक ऑफर दिल्या जात आहे. याचा पुरेपूर फायदा ठाणेकरांनी घेतलेला दिसला.
सराफा दुकानांमध्ये दुपारी चारनंतर गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. सोने साठ हजारांच्या घरात गेले असले, तरी एक ग्रॅम वळे, सोन्याचे नाणे खरेदी करणाऱ्‍यांची संख्या जास्त असल्याचे सराफांनी सांगितले. सोन्याचे दागिने घेणाऱ्‍यांनाही घडणावळीत सूट देण्याच्या योजना अनेक सोने व्यापाऱ्‍यांनी दिल्याने काहीसा दिलासा मिळालेला दिसला. दुसरीकडे इलेक्ट्रोनिक दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. यामध्ये सर्वाधिक एक ते दीड टनच्या एसीला मागणी असल्याचे दिसून आले. अनेक गृहप्रकल्पांमध्येही बुकिंग झाले; तर काहींनी या मुहूर्तावर नवीन घरांमध्ये प्रवेश केला. अक्षय्य तृतीयेच्या उत्साहासोबत रमजान ईदचाही जल्लोष पहायला मिळाला.

गोडव्याचा आनंद लुटला
मुंब्रा, राबोडी, भिवंडीसारख्या मुस्लिमबहुल भागामध्ये सकाळी नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम समाजाने मशिदीत गर्दी केली होती. त्यानंतर एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. हिंदूंच्या घरी आमरस, खीर; तर मुस्लिमांच्या घरी शिरखुरमा असा गोडव्याचा आनंद लुटण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com