बनावट कागदपत्राने बँकेला ६३ लाखांना गंडा

बनावट कागदपत्राने बँकेला ६३ लाखांना गंडा

अंबरनाथ, ता. २२ (बातमीदार) : गृहकर्ज घेण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून आयडीबीआय बँकेची ६३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीस आला आहे. कोणताही पुरावा नसताना सात जणांच्या एका टोळीचा छडा लावण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून ४३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. यामध्ये २६ वर्षांची एक तरुणी या टोळीची मास्टरमाईंड असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नवी मुंबईला राहणाऱ्या दिशा पोटे यांना कामोठे येथील जयंत बंडोपाध्याय यांचे घर खरेदी करायचे होते. त्यासाठी त्यांच्याच तोंडओळखीच्या रसिका नाईक, रमाकांत नाईक आणि मंदार नाईक यांनी कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देत बंडोपाध्याय यांच्याकडून कागदपत्रे घेतली. त्यानंतर अंबरनाथच्या आयडीबीआय बँकेत दिशा पोटे यांच्या नावाने गृहकर्जासाठी अर्ज करण्यात आला; तर दुसरीकडे ज्यांच्या खात्यात ही कर्जाची रक्कम जमा होणार होती, त्या बंडोपाध्याय यांच्या नावाने मात्र एक बनावट खाते नवी मुंबईच्या आयसीआयसीआय बँकेत उघडण्यात आले. आयडीबीआय बँकेने दिशा पोटे यांची कागदपत्रे तपासून त्यांचे गृहकर्ज मंजूर केले आणि कर्जाची रक्कम ही थेट बंडोपाध्याय यांच्या बनावट खात्‍यात जमा झाली. यानंतर सिडकोच्या ‘ना हरकत’ दाखल्यासाठी पोटे यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने बँकेने बंडोपाध्याय यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी बंडोपाध्याय यांनी आपले घर विकायचे आहे हे जरी खरे असले, तरी आपल्याला अद्याप कर्जाचे पैसे मिळालेले नसून आपले आयसीआयसीआय बँकेत खातेसुद्धा नसल्याचे सांगितले.
-----------------------
पोलिसांचा यशस्‍वी तपास
सगळा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच आयडीबीआय बँकेने अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. २३ डिसेंबर २०२२ पासून हे प्रकरण सुरू होते. ५ जानेवारी २०२३ मध्ये कर्ज मंजूर झाले. ४ मार्च २०२३ रोजी बँकेतर्फे याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, सात जणांना अटक करण्यात आल्याचे निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com