विष्ठेपासून कोंबडी खत

विष्ठेपासून कोंबडी खत

दीपक पाटील, नेरळ
आजच्या काळात शेती करताना अनेक अडचणी येत असतात. मात्र त्यातून मार्ग काढून समस्येमध्येच समाधान असल्याचा आदर्श काही तरुण शेतकरी समाजासमोर ठेवत आहेत. कर्जत तालुक्यातील बार्डी येथील हेमंत कोंडिलकर हा तरुण याच पठडीतला ! पोल्ट्री व्यवसाय आज प्रगत आणि प्रगल्भ होत आहे; मात्र त्यात असणाऱ्या अडचणी हेमंत या तरुणाला व्यथित करत होत्या. त्यामुळे त्यातील मुख्य अडचण असलेली कोंबड्यांची विष्ठा यावर त्याने संशोधन सुरू करत केवळ विष्ठेची दुर्गंधी मिटवली नाही, तर त्यापासून शेतीला उत्तम मात्रा ठरणारे सेंद्रिय असे कोंबडीखतही तयार केले. हेमंतच्या या कार्याची दखल पशु संवर्धन विभागापासून आज सर्वांनीच घेतली आहे.
जगात लोकसंख्या वाढत असताना त्यांना पुरेसे असे अन्न निर्माण होत नसल्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे रासायनिक शेतीला महत्त्व दिले जाते; परंतु रसायनांचा मोठा वापर हा शेतीचा पोत बिघडवण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे त्यापासून निर्माण होणारे अन्नही कसदार राहत नाही, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. कर्जत तालुक्यातील नेरळ आणि कर्जतच्या मध्यावर रेल्वेपट्ट्यात बार्डी हे छोटेसे गाव वसलेले आहे. या गावातील हेमंत कोंडीलकर हा तरुण आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करून एका बिल्डरकडे नोकरी करत होता; मात्र लहानपणापासून शेतीचा ओढा असल्याने तो शेतीकडे वळला. भाजीपाला लागवड करताना विषमुक्त अन्न निर्माण करण्याची गरज आहे, हे त्याने हेरले. हे अमलात आणताना सेंद्रिय खतांची मात्रा आवश्यक होती. त्यातही कमी खर्चात सेंद्रिय खते शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे असल्याचे त्याच्या लक्षात आले.
तर दुसरीकडे शेतीला जोड म्हणून शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत आहेत. पण कोंबड्यांच्या विष्ठेची दुर्गंधी साफ करणे हे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. त्यामुळे हेमंतने या विष्ठेपासून सेंद्रिय खतनिर्मिती होऊ शकते, यासाठी प्रयत्न करायचे ठरवले. कोंबड्यांच्या विष्ठेत असणाऱ्या नत्राच्या अधिक प्रमाणामुळे शेतीचे नुकसान होते. ते कुजलेले नसल्याने जमिनीत हुमणीची समस्या व्हायची. त्यावर उपाय शोधत त्याने पंचगव्यापासून बनवलेले कल्‍चर पोल्ट्रीतील तुसावर विशिष्ट प्रमाणित फवारणी केली. तेव्हा पोल्ट्रीतील दुर्गंधी कमी झाली. तसेच उत्तम प्रकारचे व कमी खर्चातले खत तयार झाले. हे कोंबडीखत शेती भाजीपाला, फळझाडांवर वापरले असता खूप चांगले परिणाम समोर आले. भाज्यांमधील तजेलदारपणा, टवटवीतपणा आणि चव उत्तमरित्या असल्याचे वापरकर्त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात सेंद्रिय बनवता आले असल्याचे संधान हेमंतने व्यक्त केले. यानंतर आतापर्यंत २०० पेक्षा अधिक पोल्ट्री फार्ममध्ये यशस्वी प्रयोग हेमंतने केले आहेत.

पुरस्कारांनी सन्मानित
शेतीमध्ये नवीन काहीतरी करून दाखवले असल्याने त्याच्या या कार्याची दखल घेऊन जिजाऊ बहुउद्देशीय सामाजिक संस्था नागपठाण ‌औरंगाबाद या संस्थेकडून छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२२, दि. बा. महोत्सव २०२१ भूमिपुत्र सन्मान हा मानाचा पुरस्कार, रायगड प्रेस क्लब आणि कर्जत तालुका प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शेतकरी पुरस्कार २०२२, सेलेबस अँड ग्रोसिबस या संस्थेकडून महाराष्ट्र रत्न २०२३, वृत्तवाहिनीकडून आदर्श शेतकरी पुरस्कार २०२३ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. तर पशुसंवर्धन विभागानेही हेमंतच्या या कार्याची दखल घेतली असून त्यांनीही या प्रकल्पाचे कौतुक केले आहे.

आजच्या शेतीमध्ये विषमुक्त अन्न पिकवणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कमी खर्चात सेंद्रिय खत उपलब्ध व्हायला हवे आहे; मात्र सध्या पशुधन सर्व शेतकऱ्याकडे राहिलेले नाही. त्यामुळे सेंद्रिय खत तयार करणे सोपे राहिले नाही. तेव्हा शेतकऱ्यांना कमी खर्चात सेंद्रिय खत उपलब्ध करण्याचा मानस घेऊन पोल्ट्रीतील अडचण ही संधी बनवली. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. आजचे दिसणारे यश हे कधी काळी डोकेदुखी ठरली होती; पण डोळ्यासमोर शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा असल्याने हा प्रकल्प अस्तित्वात आला. कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग यांच्याकडून आज मिळणारे सहकार्य आणि यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचा मी ऋणी आहे.
- हेमंत कोंडिलकर, कोंबडीखत निर्माता शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com