मुंबईप्रमाणेच मिरा-भाईंदरचा विकास

मुंबईप्रमाणेच मिरा-भाईंदरचा विकास

भाईंदर, ता. २२ (बातमीदार) : मुंबईप्रमाणेच मिरा-भाईंदर हे केंद्र म्हणून विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे वसई-विरारसह त्याच्या पलिकडे असलेल्या महानगर क्षेत्राला एक योग्य प्रकारची चालना व नियोजनबद्ध स्वरूप देता येणार असल्‍याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मिरा-भाईंदर येथे दिली. मिरा-भाईंदरपर्यंत येत असलेली मेट्रो आता उत्तनपर्यंत वाढविण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्‍याचे फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

मिरा-भाईंदरमधील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार गीता जैन, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, माजी आमदार नरेंद्र मेहता व महापालिका आयुक्त दिलीप ढोले या वेळी उपस्थित होते. मिरा-भाईंदरमधील लोकसंख्येचा ताण वाढत आहे. याआधी मिरा-भाईंदरला आवश्यक तेवढ्या पायाभूत सुविधा मिळाल्या नाहीत. मात्र २०१४ नंतर शहराच्या परिवर्तनावर विशेष लक्ष देण्यात आले. त्यामुळे आगामी २५ ते ३० वर्षांच्या सुविधा सामावून घेता येतील, अशा योजना या ठिकाणी सुरू करण्यात आल्या आहेत. राज्य सरकार मिरा-भाईंदरच्या पाठी भक्कम उभे असून येथील विविधकामांना चालना देऊन योजना वेगाने पूर्ण करण्यात येतील. येथील विकासाची गाडी आता थांबणार नाही, असे आश्‍‍वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले.
-----------------------
मेट्रोची धाव उत्तनपर्यंत
मधल्या काळात मेट्रोचे काम जवळपास ठप्प झाले होते. ते आता अत्यंत वेगाने सुरू झाले आहे. मिरा-भाईंदरच्या मेट्रोचे काम नियोजित वेळेपेक्षा दीड वर्षे मागे आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मेट्रो संदर्भातील मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या आढावा बैठकीत मेट्रो उत्तनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्‍याचे फडणवीस यांनी सांगितले.
--------------------
मिरा-भाईंदरला भेडसावणाऱ्या पाणी समस्येसाठी एमआयडीसीकडून पाणी वाढवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. सूर्या धरण योजनेमुळे येत्या एक ते दीड वर्षात नागरिकांना चोवीस तास मिळणार आहे. मिरा-भाईंदर वसई विरार पोलिस मुख्यालयाचे कामही याच वर्षी सुरू करण्यात येईल. त्यात मुख्यालयासह पोलिस कर्मचारी, अधिकारी यांच्या वसाहतीचाही समावेश असेल. मिरा रोड येथे होणाऱ्या कर्करोग रुग्णालयासाठी राज्य सरकार आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देईल. तसेच एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची एकात्मिक हरित यंत्रणा उभारण्याचा एक भाग म्हणून मिरा-भाईंदरला ५० ई बससाठी निधी देण्यात येईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी या वेळी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com