Mon, Sept 25, 2023

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
Published on : 24 April 2023, 3:18 am
नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : जेएनपीटीकडून पनवेलकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उरणमधील करळ फाटा पुलाखाली घडली. या घटनेनंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
अपघातातील महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. तिचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून पेहरावावरून ती फिरस्ती दिसते. गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ती करळ पुलाखालून रस्ता ओलांडून जात होती. त्याच वेळी जेएनपीटीकडून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाने तिला धडक दिली. यात सदर महिला गंभीर जखमी होऊन काही वेळेतच तिचा मृत्यू झाला. महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.