Expressway Accident
Expressway Accidentsakal

Expressway Accident : अपघात कमी करण्यासाठी महामार्गांवर वायूवेग पथक २४ तास सज्ज

मुंबई-गोव्यासह ‘एक्‍स्‍प्रेस वे’वर दीर्घकालीन उपाययोजनांवर प्रशासनाचा भर

अलिबाग : रायगड जिल्ह्यातून मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा हे दोन महामार्ग सर्वात रहदारीचे असून अपघातांचे प्रमाणही जास्‍त आहे. गुरुवारी सकाळी खोपोलीजवळ अंडा पॉईंटवर झालेल्‍या अपघातात १२ वाहने एकमेकांना धडकली. ढोल पथकातील १३ मुलांना जीव गमवावा लागल्‍याची घटनाही पंधरा दिवसांपूर्वी घडली होती.

अनेकदा चालक नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवतात. त्‍यामुळे अपघात होतात. हे टाळण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग व पुणे-मुंबई जुना महामार्ग तसेच अन्य महामार्गांवरील रस्ते अपघात कमी करण्यासाठी २४ तास वायूवेग पथक कार्यरत राहणार आहे.
गेल्‍या काही महिन्यांत झालेल्‍या अपघातांची तीव्रता लक्षात घेत, जिल्हा प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजना सुरू केल्या आहेत.

यासाठी सर्व्हे करण्यात आला असून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर आयटीएमएस प्रणालीसह (इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) २४ तास सज्ज असलेले वायूवेग पथक मदतीसाठी तैनात ठेवण्यात येणार आहे. याशिवाय माणगाव येथे अवजड वाहनांसाठी फिटनेस ट्रॅक सुरू करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत.

जिल्हा कार्यक्षेत्रात २२ ब्लॅक स्पॉटस् निश्चित करण्यात आले आहेत. संबंधित विभागांनी तातडीने त्‍या ठिकाणी पाहणी करून अपघात कमी करण्याकरिता तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हा नियोजन भवन येथे संसदीय रस्ते सुरक्षा समितीची आढावा बैठक नुकतीच झाली.

बोरघाटात १५ एप्रिल रोजी झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा गांभीर्याने घेतला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेल्या १८ ब्लॅक स्पॉटस्, राज्य महामार्ग यांच्या अखत्यारीत असलेल्या २ ब्लॅक स्पॉटस् व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील मार्गावरील २ ब्लॅक स्पॉटची परिवहन विभाग, पोलिस विभाग, सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांमार्फत संयुक्त पाहणी करून अपघात टाळण्यासाठी उपाययोजनांवर भर दिला आहे.

होणाऱ्या उपाययोजना
- महामार्गावर दिशादर्शक चिन्हांचे बोर्ड, मार्गदर्शक चिन्हांचे बोर्ड, वेगमर्यादेचे बोर्ड, रमलर स्ट्रिप्स, कॅट आईस व ब्लिंकर्स बसविणे
- कशेडी घाटामध्ये आवश्यक सूचना फलक बसविण्यात यावेत.
- ब्लॅक स्पॉटवरील रस्त्याची दुरुस्ती, धोकादायक वळणांची तीव्रता कमी करणे, सुरक्षा कठड्यांची दुरुस्ती

दंडात्‍मक कारवाई
विनाहेल्मेट, विनासीटबेल्ट, लेन कटिंग, अतिवेग, प्रखर दिवे, मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणे, कर्णकर्कश हॉर्न, रिफ्लेक्टर्स, ब्रेक लाईटस् व्यवस्थित नसणे अशा अनेक चुकीच्या बाबींसाठी वाहनचालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. महामार्गावर काही ठिकाणी पेट्रोल पंप, हॉटेलचालकांनी अवैधरीत्या रस्तादुभाजक बनवले असून ते अपघातास कारणीभूत ठरत आहेत. त्‍यावरही दंडात्‍मक कारवाईच्या सूचना दिल्‍या आहेत.

माणगाव येथे फिटनेस ट्रॅक
मुंबई-गोवा महामार्गावरून अवजड वाहने मोठ्या प्रमाणात जातात. जेएनपीटी, दिघी-आगरदंडा बंदरात उतरलेला मालाची वाहतूक या माध्यमातून होते. अनेकदा वाहने नादुस्त असतात, त्याच स्थितीत ती चालवल्याने अपघाताची शक्‍यता जास्‍त असते. यासाठी रायगड जिल्ह्यातील दक्षिण विभागातील वाहनमालकांच्या सोयीकरिता माणगाव येथे फिटनेस ट्रॅक उभारण्याबाबत आवश्यक ते नियोजन करावे, अशा सूचना सुनील तटकरे यांनी केल्‍या आहेत.

एक्स्‍प्रेस वेवर इंटेलिजंट सिस्टीमसाठी सर्व्हे
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीचा आहे. या ९४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरून दररोज सुमारे ६० हजार वाहने धावतात. या ठिकाणी वेगाची मर्यादा निश्चित असून कडक नियमही लागू आहेत. हा संपूर्ण रस्ता सीसी टीव्हीच्या नियंत्रणाखाली असेल. वाहनांचा वेग तपासण्यासाठी सरासरी स्पीड डिटेक्शन सिस्टीम आणि लेन डिसिप्लीन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम ३९ ठिकाणी बसवण्यात येणार आहे. यासह मुंबई-पुणे महामार्गावर आयटीएमएस (इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) बसवण्यासाठीही सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

अपघात टाळण्यासाठी महामार्गावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. या मार्गावरून प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होते. सर्व्हे करून २२ ब्‍लॅकस्‍पॉट निश्चित करण्यात आले आहे. येथे दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत.
- महेश देवकाते,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com