पापड निर्मितीतून महिला सक्षम

पापड निर्मितीतून महिला सक्षम

विक्रमगड, ता. २९ (बातमीदार) : तालुक्यात अनेक खेडोपाड्यांत बचत गटांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पापड तयार करणे व रेडिमेड वाळवण, गव्हाच्या कुरडया, सांडगे, सेवया, साबुदाणाच्या पापड्या बचत गटांच्या माध्यमातून तयार करून ग्रामीण भागात उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. नोकरीच्या व्यापात महिलांना हे पदार्थ बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे काही गृहिणी घरी किंवा महिला बचत गटांमार्फत हे पदार्थ बनवून दुकानात तसेच घरच्या घरी अगर स्टॉलमार्फत विकतात. यामुळे महिलांनाही रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे.
विक्रमगड, जव्हार भागात नागली व तांदळाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जात असल्याने नागलीपासून व तांदळापासून येथील महिला स्वयंरोजगाद्वारे पापड्या बनवण्याचे काम करत आहेत. त्याचप्रमाणे त्याची विक्री प्रामुख्याने होळीच्या सणाला बाजारात केली जाते; मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे मुष्कील केले असून यंदा वाळवणावरही त्याचा स्पष्ट परिणाम दिसून आला आहे. गेल्या वर्षी हे वाळवण शेकडा १५० ते २०० रुपयापर्यंत मिळत होते, तेच आता २५० ते ३०० रुपये शेकडाप्रमाणे खरेदी करावे लागत असल्याचे खरेदी करणाऱ्या महिलांनी सांगितले.


चवीला कष्टाची जोड
सांडगे, पापड यासाठी महिलांना अपार कष्ट सोसावे लागतात. नाचणी, तांदळाचे पिठ शिजवून घेऊन त्याचे एकसमान पापड तयार करावे लागतात. सांडग्यांसाठी जात्यावर कडधान्य भरडून त्याचे गोल गोल चिंचोक्याच्या आकाराएवढे सांडगे घालणे हे खूप वेळखाऊ आणि कष्टाचे काम असते. पिठाच्या पापडांमध्ये विविध रंग लावूनही त्यांना आकर्षक बनवले जाते. पापड सुकवण्यासाठी स्वच्छ जागेची निवड करावी लागते. धूळ अथवा कचरा त्यावर पडल्यास तसाच चिकटून राहतो. त्याची नीट काळजी घ्यावी लागते. शिवाय, अवकाळी पाऊस झाल्यास नुकसानीची भीतीही असते. त्यामुळे सतत कडा पहारा ठेवावा लागतो. जनावरे अथवा पक्ष्यांकडूनही नुकसानीची शक्यता असते. त्यामुळे हे मोठे कष्टाचे काम असते.

------------
वाळवणासाठी जागेचा आणि वेळेचा अभाव
पूर्वी महिलांना दुपारच्या रिकाम्या वेळेत वाळवणाचे पदार्थ करण्याच्या सवयी होत्या. उन्हाळा आला की धान्य वाळवून ते भिजवून त्यांचे सांडगे, कुरडया केल्या जायच्या. वर्षभराचा साठा एप्रिल-मे या दोन महिन्यांत करून ठेवला जातो. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पुरेसा वेळ तसेच जागा असणे गरजेचे आहे. पूर्वी घरासमोर अंगण असायचे. त्यामुळे वाळवणासाठी जागा असायची; मात्र आता महिला नोकरी करू लागल्याने व सध्याच्या धावपळीच्या व आधुनिक युगामध्ये सर्वांनाच वेळ मिळत नाही. ब्लॉक सिस्टीममुळे वाळवण कुठे वाळवायचे हा प्रमुख प्रश्न आहे.

---------------------
बचत गटांमार्फत काम
ग्रामीण भागात वाळवणासाठी पुरेसी जागा असल्यामुळे अनेक महिला हे पदार्थ घरच्या घरी बनवून दुकानात जाऊन विकतात. तसेच बचत गटाच्या माध्यमातून हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे अनेक दुकानदार हे पदार्थ बचत गटांना ऑर्डर देऊन बनवून घेतात. काही महिला दोन महिने हे पदार्थ बनवल्यावर सार्वजनिक ठिकाणी अगर घरोघरी जाऊन विक्री करताना दिसतात. त्यामुळे त्यांना वर्षभर उत्पन्नाचे साधन निर्माण होते.

----------------------------
आमच्या महिला बचत गटामार्फत आम्ही वेगवेगळ्या ऋतू, हंगामानुसार ऑर्डरनुसार पापड व इतर पदार्थ बनवून देतो. त्यामुळे आम्हाला चांगले उत्पन्न मिळत असते. ज्याप्रमाणे आर्डर येईल, त्या प्रमाणात विक्री होत असते. शिवाय काम आवडीचे असल्यामुळे यामध्ये वेळ लागत असला तरीही आळसपणा येत नाही.
- वैशाली सांबरे, अध्यक्ष, गृहलक्ष्मी बचत गट

----------------------
शासन महिला बचत गटांना विविध स्वरूपात अनुदान देऊन लघुउद्योग करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. आमच्या बचत गट व ग्रामसंघाला शासनामार्फत वेळोवेळी मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळत असते. त्यामुळे आम्ही याचा फायदा घेत घरीच ऑर्डरनुसार पदार्थ बनवून देत असतो.
- माधुरी वरखंडा, विश्वास महिला ग्रामसंघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com