अत्याधुनिक पद्धतीने पोटविकारांचे देखील होणार निदान

अत्याधुनिक पद्धतीने पोटविकारांचे देखील होणार निदान

कूपर रुग्णालयात एन्डोस्कोपी
अत्याधुनिक पद्धतीने पोट विकारांचेदेखील निदान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : कोविड काळातील अडचणी लक्षात घेऊन उपनगरीय रुग्णालयेदेखील अत्याधुनिक करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. त्यातील एक भाग म्हणून पश्चिम उपनगरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालय येथे एन्डोस्कोपी सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे अत्याधुनिक पद्धतीने पोटविकारांचे निदान करणे शक्य होणार आहे.
पालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांच्या निर्देशाने मुंबईकरांना अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
विलेपार्लेतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालय येथे शल्यचिकित्सा विभागाच्या वतीने एन्डोस्कोपी सेवा सुरू करणे, हा त्याचाच एक भाग आहे. या एन्डोस्कोपी सेवेचे लोकार्पण शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि प्रख्यात एन्डोस्कोपिस्ट डॉ. मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

काय आहे एन्डोस्कोपी?
एन्डोस्कोपी ही पोटविकारांचे निदान करण्यासाठी केली जाणारी अत्याधुनिक प्रक्रिया आहे. याअंतर्गत अत्यंत सूक्ष्मपणे पाहू शकणारी दुर्बिण ही एन्डोस्कोपीच्या मदतीने शरीराच्या नैसर्गिक छिद्रांतून शरीराच्या आत सोडली जाते. एन्डोस्कोप ही एक लांब, पातळ आणि लवचिक नलिका असते. या नलिकेच्या पुढील बाजूस उच्च क्षमतेचा कॅमेरा असतो. त्या माध्यमातून पोटातील विविध अवयवांच्या प्रतिमा डॉक्टर संगणक किंवा अन्य पटल (स्क्रिन) वर पाहू शकतात. याद्वारे वैद्यकीय तज्ज्ञांना विविध आजारांचे अचूक निदान करण्यास मदत होते.

रुग्णांना दिलासा
कूपर रुग्णालयात एन्डोस्कोपी सेवा सुरू झाल्याने येथे येणाऱ्या विशेषतः पश्चिम उपनगरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते व त्यांच्या सहकारी वैद्यकीय चमूने रुग्णसेवेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने सातत्याने पाठपुरावा करून एन्डोस्कोपी सुविधा सुरू करण्यात यश मिळवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com