प्रस्ताव मंजुरीचे अधिकार आता तालुकास्तर

प्रस्ताव मंजुरीचे अधिकार आता तालुकास्तर

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : शेती करताना नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे होणाऱ्या अपघातामुळे मृत्युमुखी पडलेल्या, अथवा कायमचे अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना कार्यान्वित आहे. या योजनेचे प्रस्ताव मंजुरीचे अधिकार आता तालुकास्तरावरील तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले आहेत. त्यामुळे अपघातग्रस्त शेतकरी अथवा त्यांच्या कुटुंबीयांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) अपघात विम्याची रक्कम मिळणार आहे, अशी माहिती कृषी विभागाचे कोकण विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी दिली.
नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात व मानवनिर्मित, तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात, यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना कायमचे अपंगत्व येते. घरातील व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकरी अथवा त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही योजना २००५-२००६ पासून राबविण्यात येत आहे. मात्र, या योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाने योजनेत बदल करून २३ ऑगस्ट २०२२ पासून अपघाती मृत्यू, अपंगत्व यासाठी नवीन सानुग्रह अनुदान योजना लागू केली आहे, अशी माहिती अंकुश माने यांनी दिली. या नवीन योजनेत पूर्वीच्या योजनेतील त्रुटी दूर करून शेतकरी अनुकूल अशी कार्यपद्धती अवलंबविण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने यासाठीचे प्रस्ताव मंजुरीचे अधिकार तालुकास्तरावरील तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले आहेत. तसेच पात्र प्रस्तावांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीने करण्याची कार्यवाही तालुकास्तरीय समिती करणार आहे.
................................................
यासाठी मिळणार अनुदान
शेती व्यवसाय करताना होणाऱ्या अपघात, रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, कीटकनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, हत्या, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्प दंश-विंचू दंश, जनावरांच्या हल्ल्यामुळे जखमी, मृत्यू, दंगल अन्य कोणतेही अपघात, तसेच अपघाताच्या व्याख्येनुसार कोणत्याही अनपेक्षित, आकस्मिक दुर्दैवी अपघातामुळे होणारे मृत्यू, अथवा अपंगत्व या बाबींचा समावेश या योजनेत असणार आहे. या यादीमध्ये आता बाळंतपणातील मृत्यूचाही समावेश करण्यात आला आहे.
.....................................
ही मदत मिळेल
महाराष्ट्र राज्यातील अपघाताच्या दिवशी स्वतः वहीतीधारक खातेदार असलेले शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य असे १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांचा समावेश असेल. अपघाती मृत्यू, तसेच अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव अथवा एक डोळा व एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास दोन लाख रुपये, तर अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास एक लाख रुपये लाभ मिळणार आहे.
…………………………
* लाभासाठी ही कागदपत्रे लागतील
अपघात घडल्यानंतर तीस दिवसांच्या आतमध्ये सात-बारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्याचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गाव नमुना ६ क नुसार मंजूर वारसाची नोंद, शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणीकरता त्याचा शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र असे वयाची खात्री होणारे कागदपत्र, प्रथम माहिती अहवाल (एफआयआर), स्थळ पंचनामा, पोलिस पाटील माहिती अहवाल आदी कागदपत्रे या अनुदानासाठी लागणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com