अवधनगरात अनधिकृत बांधकामांचे पेव

अवधनगरात अनधिकृत बांधकामांचे पेव

मनोर, ता. २९ (बातमीदार) : बोईसर-नवापूर रस्त्यावरील अवधनगर भागात अनधिकृत बांधकामांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या सरकारी मालकीच्या भूखंडावर परप्रांतीयांनी अतिक्रमण करून अनधिकृत इमारती, निवासी चाळी, व्यापारी गाळे आणि गोदामांचे बांधकाम केले आहे. पालघर महसूल विभाग मात्र अवधनगर भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी नोटिसा बजावून हात वर करत असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे महामार्गावरील तोडक कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे बोईसर मंडळ अधिकारी त्यांच्या कार्यालयालगतच अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. त्याकडे मात्र मंडळ अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अवधनगर परिसर अनधिकृत बांधकामांसाठी कुप्रसिद्ध आहे. भागातील अनेक भूमाफिया सक्रिय आहेत. एका भूमाफियाने अलसिफा मेडिकल स्टोअरची गल्ली आणि कादीर हॉटेल लगतच्या गल्लीमधील सरकारी जागेवर अतिक्रमण केले असून सरकारी जागेत अनधिकृत रहिवासी इमारती आणि व्यापारी गाळे बांधले आहेत. इमारतीमधील खोल्या आणि गाळे बनावट कागदपत्रांच्या आधारे गरजू लोकांना विकून भूमाफिया फसवणूक करत असल्याच्या अनेक तक्रारी बोईसर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. विक्री केलेली मालमत्ता दमदाटी करत पुन्हा बळकावून रहिवाशांना बेघर केले जात आहे.
सरकारी मालकी आणि प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जागेवरील अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी मंडळ अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात शेकडोंच्या संख्येने तक्रारी केल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारीवरून सरावली तलाठी सजेच्या कर्मचाऱ्यांकडून अहवाल बनवून कारवाई करण्यासाठी तहसीलदारांकडे पाठवण्यात आला आहे. त्यानंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या; परंतु तोडक कारवाई होत नसल्याने महसूल विभागाचे अनधिकृत बांधकामांना संरक्षण असल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


----------------------
सुनावणीवेळी गैरहजर असूनही कारवाई शून्य
सरावली आणि बोईसर-नवापूर रस्त्यावरील अवधनगर येथील अनधिकृत बांधकामांप्रकरणी काशिनाथ जाधव, सागर पाठक, सलाम खान, निवृत्ती पास्टे, सोनू पांडे, योगेंद्र दुबे, ललन पांडे, कैलाश चौहान, विष्णू गोराई, सलाम खान, आसिफ खान पठाण आणि संजय सिंग यांना पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांनी नोटिसा बजावल्या आहेत. याप्रकरणी १० एप्रिलच्या सुनावणीत यापैकी एक व्यक्ती वगळता इतर सर्व गैरहजर होते; मात्र तरीही महसूल विभाग कारवाई करण्याऐवजी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वारंवार संधी देत असल्याचा आरोप होत आहे.

-----------
अवधनगर येथील अनधिकृत बांधकामांचा अहवाल तहसीलदार कार्यालयात पाठवण्यात आला आहे. वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्यात येईल.
- मनीष वर्तक, मंडळ अधिकारी बोईसर

-------------------
सरकारी जागेवर अतिक्रमण करून भूमाफिया अनधिकृत बांधकामे करीत आहेत. अनधिकृत इमारती, चाळींमधील सदनिका, खोल्या परप्रांतीय कामगारांना विक्री करून कामगारांची आर्थिक फसवणूक केली जाते. तक्रार करूनही भूमाफियांवर कारवाई केली जात नाही.
- अजित संखे, भाजप कामगार आघाडी, जिल्हा सहसंयोजक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com