सेतू सहकाराचा

सेतू सहकाराचा

शरद्चंद्र देसाई
वकील, सहकार न्यायालय

अवाढव्य निवासी संकुलांची सुरुवातीची व्यवस्था कशी लावावी?

माझे घर एका उच्चभ्रू संकुलात आहे. त्यात आठ-दहा वेगळ्या आणि स्वतंत्र इमारती आहेत; परंतु संकुलातील सुविधा सामायिक आहेत. विकसकाने सदनिकाधारकांकडून देखभाल इत्यादीसाठी आगाऊ रक्कम गोळा केली आहे. संस्था स्थापन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, सह्या आदी बाबी करार करतानाच घेतल्या आहेत. संस्था नोंदणीकृत झाली आहे, परंतु हस्तांतरण केले नाही. याविषयी सहकार कायद्यातील तरतुदींची माहिती द्यावी.
- सुकेश शहा, डोंबिवली

उत्तर- अशा सदनिकांचे व्यवहार-करार हे महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट किंवा महाराष्ट्र अपार्टमेंट अॅक्ट याअंतर्गत केले जातात. करार नोंदणीकृत करून बांधकामाच्या प्रगतीनुसार त्याचे हप्ते गाळेधारकांकडून वसूल केले जातात. इमारतीसाठी भोगवटा प्रमाणपत्र येईपर्यंत देखभाल शुल्क आकारत नाहीत, परंतु भोगवटा प्रमाणपत्र आले की ज्या खरेदीदारांचे सर्व पैसे सदनिका, व्यापारी गाळ्यांसाठी आले, की त्यांचे हस्तांतरण करण्यात येते किंवा तसे केल्याचे दाखवले जाते. सदनिका-गाळा हस्तांतरण करताना अठरा ते चोवीस महिन्यांचे देखभाल शुल्क वसूल करण्यात येते व त्याची रीतसर पावती देण्यात येते. सहकारी संस्था ही करारासोबत घेतलेल्या कागदपत्रांच्या आधारे नोंदणीकृत करण्यात येते. संस्थेचा मुख्य प्रवर्तक हा विकसकाचा शक्यतो नोकर असतो, त्यामुळे संस्था नोंदणी प्रस्ताव निबंधक कार्यालयामध्ये दाखल केला जातो व नोंदणी दाखला व इतर कागदपत्रे मिळवली जातात. या क्षणी सहकार कायदा व त्यातील तरतुदी समोर येतात व त्याचा अंमल सहकारी कायद्यानुसार होणे हे इमारत, सभासद व विकसक यांना सहकारी कायद्यांतर्गत संस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी कायद्याच्या तरतुदी उपयोगी ठरतात.

मोठ्या संकुलांमधील इमारत-सहकारी संस्थांच्या नोंदणी व इतर बाबी सहकार कायद्यानुसार चालत नाहीत असा अनुभव आहे, परंतु जागरूक सदनिकाधारक असल्यास विकसकाला संस्था, इमारत, सदनिका, त्यातील हिशेब इत्यादी करण्यास कायद्याप्रमाणे भाग पाडता येते. विकसक व त्याचा नोकरवर्ग हा सदनिकाधारकांच्या हाती संस्था सोपवून त्यामधील जबाबदाऱ्या झटकण्याचा प्रयत्न करतात आणि विकासाच्या सर्व जबाबदाऱ्या इमारत बांधकाम करणाऱ्याकडून सहकारी संस्थेच्या माथी मारण्याचा प्रयत्न होतो. घेतलेल्या पैशांचा हिशेब देणे टाळले जाते व ज्या बाबी, उपकरणे इमारतीमध्ये लावण्यात आली आहेत, उदा. लिफ्ट, पाणी व्यवस्था, वाहनतळ, सामायिक सुविधा इ. त्याविषयी उदासीन भाव आणतात. सदनिकाधारकांनी या सर्व गोष्टींसाठी पैसे दिलेले असतात, त्यामुळे त्यांना त्याचा मोबदला मिळणे आवश्यक असते, पण सदनिकाधारक हे वेगवेगळ्या समाजातील स्तरांमधून आलेले असतात. तसेच त्यांची एकमेकांशी ओळख, माहिती नसते, हे सर्व विकसकाच्या फायद्याचे ठरते. विकसक काही सदनिकाधारकांना हाताशी धरून सहकारी गृहनिर्माण संस्था सभासदांच्या हाती देऊन मोकळे होण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी सदनिकाधारकांनी एकत्र येऊन संकुलाच्या हितासाठी तसेच स्वतःच्या हिताच्या दृष्टीने संस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा नोंदणी झाल्यापासून तीन महिन्यांत घेण्याची व्यवस्था करावी. त्या सभेमध्ये पहिल्या वर्षाकरिता सदनिका, व्यापारी गाळेधारकांची समिती स्थापन करून गाळेधारकांच्या हक्कांचे संरक्षण करावे. संस्था ही पहिल्या सर्वसाधारण सभेच्या कार्यवाहीनंतर कायद्यांतर्गत गतिमान होते व निवडलेल्या समितीस अधिकार प्राप्त होतात. अशी समिती विकसकाकडून त्याने प्रस्तावित, प्रायोजित तसेच करारामध्ये दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करून घेण्यास कायद्यानुसार सक्षम होते. सदनिकाधारकांमध्ये गैरसमज असतो, की एकदा विकसकाकडून हस्तांतरण घेतले, की विकसकाच्या जबाबदाऱ्या संपतात, परंतु हा चुकीचा समज आहे. कायद्याप्रमाणे विकसक त्याने करावयाच्या सर्व बाबींना जबाबदार असतो. सबब, पहिली सर्वसाधारण सभा पार पाडावी व नियुक्त समितीस संस्था अधिग्रहण करू देऊन कायद्याची शक्ती द्यावी. अन्य बारीक तपशिलांबाबत तज्ज्ञ वकिलाचा सल्ला व सेवा या कामी घ्यावा.

सहकारी संस्था, सहकार कायदा याबाबतचे आपले प्रश्न पुढील ई-मेल वर पाठवावेत-Sharadchandra.desai@yahoo.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com