कर्णबधीर मुक्ततेचा संकल्प

कर्णबधीर मुक्ततेचा संकल्प

प्रसाद जोशी, वसई
ऐकू येणारे बालक हे बोलणे ऐकून भाषा शिकत असते, मात्र कर्णबधिर मुलांना कर्णदोष असल्याने भाषा कानावर पडत नाही, त्यामुळे संवाद साधणे जिकरीचे होते. त्यामुळे वसई-विरार महापालिकेने अशा बालकांना वेळीच उपचार मिळावे व त्यांचा कर्णदोष दूर व्हावा यासाठी विशेष मोहिमेचा संकल्प केला आहे.
नवजात बालकांना पालकांच्या हावभावामुळे प्रतिसाद देत असतात. त्यांना श्रवणऱ्हास आहे समजण्यास उशीर होतो, आणि पुढे अशी मुले कर्णबधिर असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे वसई-विरार महापालिकेने शहरात कर्णबधिर मुलांचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळीच उपचार करून शहरात बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याचा निर्धार केला आहे. यासाठी सहा तपासणी मशिन खरेदी केल्या जाणार आहे.
महापालिकेच्या या मोहिमेअंतर्गत जन्मजात बहिरेपणा असलेल्या बालकांना मोफत निदान, उपचार व शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच अशा बालकांना स्पीच थेरेपीची सुविधा दिली जाणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील ० ते ५ वयोगटातील बालकांची माहिती जमा करून बालकांची यादी आरोग्य विभागाकडून तयार केली जाणार आहे. त्यानंतर त्यांची तपासणी महापालिकेच्या रुग्णालयात केली जाणार आहे. याचबरोबर चिंदे फाऊंडेशन, ज्युपिटर रुग्णालय आणि वसई विरार महापालिका अशा बालकांच्या उपचारासाठी मदत करणार आहे. यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना त्यांच्या पाल्यांचे उपचार करणे सोईचे होणार आहे.
साधारणपणे पाच वर्षांपर्यंत होणारे कानाचे विकार हे दूर होऊ शकतात. मात्र अनेकदा हालचालीला बालक प्रतिसाद देत असल्याने असे रुग्ण समोर येत नाही. त्यामुळे हे विकार उशिरा समोर येतात. परिणामी उपचार करणे कठीण होते. त्यामुळे महापालिकेने बालकांची तपासणी करून त्यांच्यावर त्वरित उपचारासाठी मोहीम मे महिन्यापासून राबविणार आहे.
महापालिकेचे चंदनसार, नालासोपारा, सातिवली याठिकाणी असणारे माता बालसंगोपन केंद्र व अन्य तीन ठिकाणी या मशिन उपलब्ध होणार आहे. हे तपासणी यंत्र जे. एम पोटर्लवरून मागविण्यात आले आहे. या एका मशिनची किंमत तीन लाख २० हजार इतकी आहे.
-----------------------
त्रिसूत्रीचा वापर
वसई-विरार शहरात महापालिका व खासगी रुग्णालयात महिन्याला २१ हजार बालके जन्माला येतात. दर हजारामागे दोन ते तीन बालकांना कानाचा आजार निर्माण होत आहे. जन्मजात बहिरेपणा असलेल्या बालकांसाठी बालकांचा सर्व्हे, तपासणी आणि उपचार अशी त्रिसूत्री प्रशासनाकडून वापरली जाणार आहे.
----------------------------
मोहिमेचे वैशिष्ट्य
बालकांचे माता बाल संगोपन केंद्रात निदान
अंगणवाडी, नर्सरीमध्ये समन्वय साधणार
ज्युपिटर इस्पितळात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
मोफत शस्त्रक्रिया
---------------------
जन्मजात श्रवण ऱ्हास असणाऱ्या बालकांच्या सुरक्षेसाठी ही मोहीम हाती घेतली जाणार आहे. यासाठी सर्व्हे करून बालकांना कानाचा विकार आहे का याचे निदान करून त्यानंतर उपचार केले जाणार आहेत. यासाठी कर्मचाऱ्यांना मशिन हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असून महापालिकेच्या माता बाल संगोपन केंद्रात यंत्रांची व्यवस्था केली जाणार आहे. मे महिन्यात मोहिमेला सुरुवात होईल.
- अनिलकुमार पवार, आयुक्त , महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com