प्रतिकूल परिस्थितीतही कामगारांना आरोग्य आधार

प्रतिकूल परिस्थितीतही कामगारांना आरोग्य आधार

राहुल क्षीरसागर, ठाणे
कामगार आणि संघर्ष याचे नाते जुनेच. परिस्थिती कितीही प्रतिकूल असू देत कामगार वर्ग नेहमीच हिमतीने उभा राहिला आहे. ठाणे परिसरातील या कष्टकरी घटकांना उपचार देऊन वरदान ठरलेल्या कामगार रुग्णालयाचीही तीच जिद्द सध्या अनुभवायला मिळत आहे. बाहेरून नव्या नवरीसारखी दिसणारी इमारत आतून पूर्णपणे जीर्ण झाली आहे. कोणतीही अद्ययावत सुविधा सध्या तिथे उपलब्ध नाही. पण येणाऱ्‍या आजारी रुग्णाला येथे उपचार देत ठणठणीत करण्यासाठी संपूर्ण स्टाफ धडपडतो. म्हणूनच दिवसाला या रुग्णालयात शंभर ते दिडशे कामगारांवर उपचार होत आहेत.
ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी वागळे इस्टेट भागात कामगार (इएसआयसी) रुग्णालय गेल्या अनेक वर्षापासून कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. सध्याच्या घडीला या रुग्णालयात २७ हजार विमाधारक कामगारांची नोंद असून त्यांचे कुटुंबीय असे दीड ते दोन लाखांच्या आसपास रुग्णांची संख्या आहे. या सर्व रुग्णांवर ठाणे कामगार रुग्णालयात योग्य व मोफत उपचार करण्यात येत आहे.
ठाण्यातील कामगार रुग्णालयाची ही इमारत बाहेरून सुस्थितीत दिसत असली तरी आतून खिळखिळी झाली आहे. त्यामुळे सात ते आठ मजल्यांपैकी सद्य:स्थितीत केवळ तळ अधिक पहिल्या मजल्यावरच हे रुग्णालय सुरू आहे. येथील डॉक्टर, नर्सेस इतर स्टाफ येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर उपचार करण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. या रुग्णालयाची क्षमता पूर्वी १०० बेडची होती. इमारत धोकादायक घोषित झाल्यानंतर सध्या या ठिकाणी ५० बेड कार्यरत आहेत.
सध्याच्या घडीला कामगार रुग्णालयाची इमारत धोकादायक परिस्थिती असतानाही येथील कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. त्यात रुग्णालय इमारतीची किरकोळ दुरुस्ती करण्यात आली असून जेवढे दिवस खेचता येईल तेवढे कर्मचारी कामकाज खेचत आहेत. येथे येणाऱ्या रुग्णांवर १०० टक्के मोफत उपचार केले जातात. त्यामुळे ठाणे परिसरातील या कष्टकरी घटकांना उपचार देऊन वरदान ठरलेल्या कामगार रुग्णालयाचीही तीच जिद्द सध्या अनुभवायला मिळत आहे.
.....
दररोज दीडशे रुग्णांवर उपचार
बाह्यरुग्ण विभागात आजही प्रतिदिन १०० ते १५० रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. यामध्ये औषधोपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या ९० ते १०० इतकी लक्षणीय असून त्याखालोखाल हाडांच्या आजाराबाबत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४० च्या आसपास असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
....
दोन सत्रात बाह्यरुग्ण विभाग
सध्या येथील औषधांच्या ओपीडीवर रोज ६० ते ७० रुग्ण, ऑर्थोच्या कक्षात ४५ च्या आसपास रुग्ण येतात. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दोन सत्रात बाह्यरुग्ण विभाग सुरू असून रुग्णांना वैद्यकीय आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com