जिल्ह्यात ऑनलाईन प्रणालीद्वारे वाळू विक्री

जिल्ह्यात ऑनलाईन प्रणालीद्वारे वाळू विक्री

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : राज्यातील नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने वाळू/रेती उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवरील खाडीतील वाळू, रेती उत्खनन आणि विक्री करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि पर्यावरण विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांना ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून वाळू, रेती विक्री केली जाणार आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांनी दिली.
राज्य शासनाने १९ एप्रिल रोजी शासन निर्णयाद्वारे नवीन वाळू/रेती उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्रीचे सर्वंकष धोरण जाहीर केले. येत्या १ मेपासून या धोरणाची अंमलबजावणी सर्व जिल्ह्यात होणार आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात जिल्हास्तरीय रेती/वाळू संनियंत्रण समितीची स्थापन करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने किनारपट्टी भागातील खाडीतून वाळूचे उत्खनन करून ती ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी पूर्ण करण्यात आली आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या धोरणानुसार, किनारपट्टी भागातील खाडीतील वाळू, रेती उत्खननासाठी रेती गटाची निवड ही महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या वतीने करण्यात येते. खाडीतील वाळू, रेती उत्खननासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर मेरिटाईम बोर्ड रेती गट निश्चिती करून ती माहिती जिल्हा प्रशासनाकडे पाठविते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून या रेती गटाच्या लिलावाची प्रक्रिया राबविण्यात येते.
ठाणे जिल्ह्यातील सागरी किनार पट्टी भागातील खाडीतील रेती, वाळू गटाची निवड करणे व उत्खननासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घेणे या बाबींची प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही दिवसात वाळू, रेती उत्खननासंदर्भात पर्यावरण विभागाची परवानगी मिळणे अपेक्षित आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासन वाळू लिलावाची प्रक्रिया सुरू करणार आहे, असेही जायभाये यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com