‘निर्मल लाईफ स्टाईल’चे ३० प्रकल्प रडारवर

‘निर्मल लाईफ स्टाईल’चे ३० प्रकल्प रडारवर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २९ : बांधकाम क्षेत्रातील नामांकित निर्मल लाईफ स्टाईल समूहाचे धर्मेश जैन आणि राजीव जैन यांना गुरुवारी (ता. २७) मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. घर देण्याच्या व्यवहारात ३३ ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. आता ‘महरेरा’ने निर्मल लाईफ स्टाईल समूहाच्या तब्बल ३० प्रकल्पांवर दिवाळखोरीची कारवाई सुरू केल्याचे समजते. महारेराने दिवाळखोरीची कारवाई सुरू असलेल्या ३०८ प्रकल्पांची यादी जाहीर केली. त्यात या ३० प्रकल्पांचा समावेश असल्याने हजारो ग्राहक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात निर्मल लाईफ स्टाईल समूहाने मोठ्या प्रमाणावर घरे बांधली आहेत. आजही या समूहातर्फे घरबांधणीचे काम सुरू आहे; मात्र या समूहाच्या महारेरा नोंदणीकृत तब्बल ३० प्रकल्पांविरोधात राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणामार्फत (एनसीएलटी) कारवाई करण्यात आली आहे. रेरा कायद्यानुसार महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांची माहिती तीन महिन्यांनी अद्ययावत करणे बंधनकारक आहे; मात्र हजारो प्रकल्पांमध्ये या नियमांचे उल्लंघन होत आहे. या पार्श्वभूमीवर महारेराने या प्रकल्पांवर लक्ष ठेवले असून त्यांची माहिती तपासण्यात येत आहे.

एनसीएलटीच्या संकेतस्थळावरील नादारी आणि दिवाळखोरीची कारवाई सुरू असलेल्या यादीत महारेरा नोंदणीकृत ३०८ प्रकल्पांचा समावेश आहे. ग्राहक आणि इच्छुक ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ही यादी महारेराने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. यादीत निर्मल लाईफ स्टाईल समूहाच्या तब्बल ३० प्रकल्पांचा समावेश आहे.

बहुतांश प्रकल्प कल्याणमधील
निर्मल लाईफस्टाईलचे ३० मधील बहुतांश प्रकल्प कल्याणमधील आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांनी महारेराकडे तक्रार केली आहे. त्यानुसार महारेराने ८७ तक्रारदार सदनिकाधारकांच्या २३.७९ कोटी रुपयांची वसुली आदेश जारी केले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी निर्मल लाईफ स्टाईल समूहाची मुलुंड येथील स्थावर संपत्ती जप्त केली आहे. या जप्त मालमत्तेचा लिलावही घोषित झाला होता; परंतु समूहाने उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळवल्याने हे ८७ तक्रारदार नुकसानभरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com