शिक्षक सभेचे शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र

शिक्षक सभेचे शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र

पालिका शिक्षण विभागाबाबत असंतोष
शिक्षक सभेचे शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र
मुंबई, ता. १ (बातमीदार) ः मुंबई महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाने आपल्या सर्व भाषिक प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या बदली धोरणाबाबत जारी केलेले परिपत्रक, ऑनलाईन माहिती भरण्यासाठी दिलेली मुदत तसेच पोर्टलमधील माहिती यावरून पालिका शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. बदलीसाठी माहिती मागवतानाच खासगी स्वरूपातील मागवलेल्या माहितीला शिक्षकांचा विरोध असून शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिक्षक सभेने याबाबत पत्र पाठवून पोर्टलमधून अनावश्यक माहिती वगळून शिक्षकांना आपली माहिती भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पालिका शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे.
पालिका शिक्षणाधिकारी यांनी एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात परिपत्रक काढून गतवर्षी बदली धोरणाबाबत काढलेल्या परिपत्रकाच्या प्रारूपातील मार्गदर्शक सूचनेनुसार शिक्षक, मुख्याध्यापक बदलीबाबतची माहिती प्रत्येक शिक्षकाने २७ एप्रिल ते १ मे या कालावधीत भरणे बंधनकारक असल्याचे आदेश दिले होते. बदलीसंदर्भात तयार करण्यात आलेल्या पोर्टलवर सर्व शिक्षकांनी आपली माहिती ऑनलाईन भरण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पालिका शिक्षण विभागाने तयार केलेल्या बदली पोर्टलवर माहिती भरताना शिक्षक राहत असलेल्या घराचे लोकेशन, फोटो, शाळेचे लोकेशन, आधार कार्ड, पॅन कार्ड, दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर शिक्षणाचे प्रमाणपत्र, जन्म दाखला, लग्नाचे प्रमाणपत्र, बँक अकाऊंट डिटेल्स, ब्लड ग्रुप, अक्षांश-रेखांश आदी अनेक गोष्टींची माहिती भरावी लागत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे असून त्यातील अनेक गोष्टींना शिक्षकांचा आणि त्यांच्या संघटनेचा विरोध आहे.

शिक्षकांचा आक्षेप
बदलीचा बँक अकाऊंट, ब्लड ग्रुप, लग्नाचा दाखला, अक्षांश-रेखांश आदी अनेक गोष्टींशी संबंध काय, असा शिक्षकांचा प्रश्न आहे. बदली धोरण राबवायचेच होते तर उन्हाळी सुट्टीच्या तोंडावर का, असाही प्रश्न शिक्षक विचारत आहेत.

शिक्षक सभेचे पत्र
शिक्षकांचे नेतृत्व करणाऱ्या शिक्षक सभेने पालिका शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून घाईघाईने सुरू करण्यात आलेले ऑनलाईन बदली पोर्टल व बदली धोरणाबाबत आपला विरोध नोंदवला आहे. बदलीसाठी जी अनावश्यक असलेली माहिती मागवलेली आहे, ती वगळावी तसेच आधार कार्ड, पॅन कार्डची माहिती सॅप प्रणालीत असतानादेखील पुन्हा का मागवली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

काय आहे मागणी
बदलीचे धोरण निश्चित नसल्यामुळे शिक्षकांमध्ये अगोदरच संभ्रमावस्था आहे. त्यातच या पोर्टलची भर टाकण्यात आली आहे. उन्हाळी सुट्टीच्या तोंडावर अशा प्रकारे शिक्षकांना वेठीस धरणे उचित नाही. त्यामुळे अगोदर बदलीचे धोरण निश्चित करा व त्यानंतर बदली पोर्टलबाबत विचार करा, असे शिक्षक सभेने शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच पोर्टलमध्ये विचारण्यात आलेल्या माहितीचे सुलभीकरण करावे व संयुक्तिक माहितीच मागवावी, अशी मागणी ही शिक्षक सभेने केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com