उंदीर, घुशींमुळे नाकीनऊ

उंदीर, घुशींमुळे नाकीनऊ

तुर्भे, ता. १ (बातमीदार) : आधुनिक आणि सुनियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत उघड्या गटारांमुळे उंदीर, घुशींची संख्या वाढत लागली आहे. एकीकडे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असताना आता उंदीर आणि घुशींनी धुमाकूळ घातला असल्याने नवी मुंबईकरांच्या नाकीनऊ आले आहे.
महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून उंदरांची संख्या वाढू नये यासाठी फवारणी, औषध टाकण्यात येत असले तरी गावठाण, झोपडपट्टीतील सांडपाणी वाहून नेणारी उघड्या नाल्‍यांमुळे उंदीर, घुशींचे प्रमाण वाढले आहे. गावठाण व झोपडपट्टीत काही ठिकाणी सांडपाणी वाहून नेणारे नाले खुले, तर काही बंदिस्‍त आहेत. मात्र, बंदिस्‍त नालेही घुशी, उंदरांसाठी हक्काचे ठिकाण झाले आहे. गटारावरील झाकडे बंद असली तरी माती उकरून नाले भुसभुशीत केले आहेत. त्‍यामुळे नाल्‍यातील सांडपाणी झिरपणे, तुंबणे यांसारखे प्रकार वारंवार घडतात.
----------------------------------
उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वावर
मनपा क्षेत्रातील घणसोली, कोपरखैरणे, दिघ्‍यासह आठ विभागांत सांडपाण्याच्या खुल्‍या नाल्यात उंदीर, घुशींचा मुक्तसंचार कायम सुरू असतो. तसेच केवळ गावठाण, झोपडपट्ट्यांतच नव्हे तर उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये उंदरांचा उपद्रव वाढला असून वाढत्या संख्येमुळे वाहनांचे नुकसान होते.
----------------------------------------
मूषक नियंत्रण विभाग निद्रावस्थेत
उंदीर-घुशींचा रात्री जसा मुक्त संचार असतो, तसाच वावर दिवसाढवळ्या पाहायला मिळत आहे. अशातच सध्या मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असल्याने अडगळीच्या साहित्यामुळे उंदीर-घुशींच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, गावठाण, झोपडपट्टीमध्ये जसा त्यांचा उपद्रव वाढता आहे, तसा शहरातील नोडल भागात मिळत आहे. त्यामुळे याबाबत वारंवार मूषक नियंत्रण विभागात नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. पण या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
---------------------------------------------
महापालिकेच्या मूषक नियंत्रण विभागाकडे याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या. मात्र, त्यांच्याकडून वेळीच दखल घेतली जात नसल्याने उंदीर-घुशींचा वावर अधिक वाढला आहे.
- चेतन पाटील, नागरिक
़़़़़़़ः-------------------------------------------------
नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या की मूषक नियंत्रण विभागातील कर्मचारी तिथे जाऊन गोळ्या व फवारणी करतात. ज्या ठिकाणी उंदीर-घुशींचे प्रमाण वाढले आहे. तिथे लवकरच उपाययोजना करण्यात येतील.
-डॉ.श्रीराम पवार, उपायुक्त, पशु वैद्यकीय विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com