हापूसचा गोडवा अवकाळीने हिरावला

हापूसचा गोडवा अवकाळीने हिरावला

वाशी, ता.१(बातमीदार) ः बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने यंदा शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही काही भागात पावसासह गारपीट होत असल्याने आंब्याचा मोहर गळून गेला आहे. परिणामी, एप्रिलमध्ये बाजारात येणारा हापूस आंबा फारच कमी प्रमाणात बाजारात आला असल्याने ऐन हंगामातच हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.
गोडीमुळे फळांचा राजा म्हणून सर्वश्रृत असलेला हापूस आता वाढत्या दरांमुळेही बाजारात राजा झाला आहे. एप्रिल आणि मे हा हापूस आंब्याचा मुख्य हंगाम आहे. मात्र, या मुख्य हंगामातच हापूस आंब्याची कमतरता जाणवत आहे. नेहमी एप्रिलच्या दरम्यान बाजारात हापूस आंब्याच्या ८० ते ९० हजार, तर कधी कधी एक लाख पेट्यांचीही आवक झालेली आहे. असे असताना यंदा मात्र एेन हंगामात वाशीच्या घाऊक फळ बाजारात कोकणातून १७ ते १८ हजार पेट्या येत आहेत. त्यामुळे हंगामातच हापूसची आवक २० टक्क्यांवर आल्याने हापूसचे दर चढेच आहेत. त्यामुळे अस्सल कोकणी हापूसच्या एका डझनसाठी बाजारात आत्ता एक हजार ते बाराशे रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत.
------------------------------
मे मध्ये आवक वाढणार
एप्रिलमध्ये हापूसचे दर कमी होतात म्हणून सर्वसामान्य नागरिक या महिन्याची वाट पाहत असतात. याच महिन्यात सर्वाधिक सर्वसामान्य आंब्याची गोडी चाखतात. मात्र, यावेळचे चित्र अगदी उलट आहे. ५ ते १० मेपर्यंत बाजारात हीच स्थिती राहणार आहे. त्यानंतर कोकणातून हापूस आंब्याची आवक वाढण्याची शक्यता काही व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. ती आवक वाढल्यावर हे दर कमी होण्याची शक्यता आहे.
------------------------------------
कर्नाटकी हापूसची बाजारात विक्री
हापूसची आवक कमी असल्याने अनेक व्यापारी कर्नाटक आणि इतर ठिकाणाहून येणारा आंबा हापूसच्या नावाने विकून नफा मिळवत आहेत. काही व्यापारी आंब्याचे दर १२०० ते हजार रुपये सांगतात आणि मग अगदी ४०० रुपये डझनाने आंबे ग्राहकांना विकत आहेत. यामुळे ग्राहकही खूष होत आहेत. मात्र, आंब्यांची चव चाखताना हे अस्सल हापूस नसून, कर्नाटकी आंबे असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहेत. हे आंबे घाऊक बाजारात १५० ते १७० रुपये किलोने विकले जात आहेत. त्यामुळे हापूसच्या नावाने ग्राहकांची फसवणूक होत आहे.
---------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com