खारघरमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू

खारघरमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू

खारघर, ता. १ (बातमीदार) : एकनाथ शिंदे सरकारने मुंबईसह राज्यभरात ''बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'' ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र आणि कामगार दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता. १) राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ३१७ ''आपला दवाखाना'' सुरू करण्यात आले. त्यात पनवेल महापालिकेच्या खारघर सेक्टर १२ येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात हा दवाखाना सुरू करण्यात आला. या दवाखान्याचे उद्‍घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही नवीन आरोग्य योजना आहे. राज्यभरातील महापालिका आणि सरकारी रुग्णालयांत रुग्णांची प्रचंड गर्दी दिसून येते. रुग्णांना उपचार आणि वैद्यकीय तपासणी करण्यासाठी घरापासून दूर असलेले रुग्णालय गाठावे लागत असे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात रुग्णास मोफत उपचार मिळणार आहे. माता सुरक्षित, तर घर सुरक्षित असते. त्याअनुषंगाने महिला रुग्णांना विविध आरोग्य सुविधा मिळणार आहेत. खारघरमधील दवाखान्यात आमदार प्रशांत ठाकूर यांनी फीत कापून दवाखाना सुरू केला. उद्‍घाटनप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी, शहरी, ग्रामीण आणि झोपडपट्टी भागातील नागरिकांना चांगली आणि दर्जेदार आरोग्य सेवा दिली जाणार असल्याचे सांगितले. या वेळी पालिका आयुक्त गणेश देशमुख, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आनंद गोसावी, माजी नगरसेवक, आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
खारघर येथील आपला दवाखाना दुपारी २ ते रात्री १० या वेळेत सुरू असणार आहे. तसेच ३५ प्रकारच्या तपासणी मोफत केली जाणार आहे. दवाखान्यात बालरोग, स्त्रीरोग, त्वचा, डोळ्याचे आजार आदी विविध आजारांवर तपासणी करून पुढील उपचार करण्यात येणार आहे.

खारघर सेक्टर १२ येथील आरोग्य वर्धिनी केंद्रातील आपला दवाखान्यात महालॅबच्या माध्यमातून विविध प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. याशिवाय आठवडा आणि पंधरावडा वार ठरवून स्त्रीरोग तज्‍ज्ञ, स्किन, तसेच नेत्रतपासणी आदी आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून उपचार केले जाणार आहे. हा दवाखाना शहराच्या मध्यभागी असल्यामुळे सर्वांसाठी सोयीचे आहे.
- डॉ आनंद गोसावी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पनवेल महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com