इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा आठवर

इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा आठवर

भिवंडी, ता. १ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील वळ गावात वर्धमान कंपाऊंडमध्ये गोदामाची इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली होती. सोमवारी (ता. १) सकाळी मिळालेल्या दोन मृतदेहानंतर आता मृतांची संख्या आठ झाली आहे. पोलिसांकडे कोणी हरवल्याची तक्रार न आल्याने तीन दिवसांनंतर एनडीआरएफच्या जवानांनी बचावकार्याची मोहीम थांबवल्याचे जाहीर केले.
शनिवारी (ता. २९) दुपारी इमारत कोसळल्यानंतर एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या जवानांचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. प्रथम दोन लहान मुलांना जिवंत बाहेर काढत कामाला सुरुवात केली. सोमवारी शेवटच्या दिवशी सकाळी अशोक मिश्रा (वय ३२) व दिनेश तिवारी (वय ३४) या दोन जणांचे मृतदेह ढिगाऱ्याबाहेर काढले. या रेस्क्यू टीमबरोबर डॉगस्कॉटदेखील कार्यरत होता. त्यामुळे या टीमला अडकलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी मदत होत होती. सोमवारी मिळालेल्या दोन मृतदेहानंतर मृतांची संख्या आठ झाली आहे. बघ्यांच्या गर्दीमुळे माणकोली ते अंजूरफाटा या मार्गावर झालेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नारपोली वाहतूक विभागाने प्रचंड मेहनत घेतली. सोमवारी सकाळी हे काम थांबवण्याच्यावेळी प्रांत अधिकारी अमित सानप, तहसीलदार अधिक पाटील व स्थानिक पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

----------------------
तब्बल ४५ तास बचावकार्य
दुर्घटना घडल्यानंतर एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या जवानांचे बचाव पथक घटनास्थळी सतत तीन दिवस परिश्रम करत होते. त्यामुळे १० जणांना वाचवण्यात त्यांना यश आले. या गोदामात कामगार आणि माथाडी कामगार काम करत होते. गोदामासमोरील कंटेनरमधून बॉक्स बाहेर काढण्याचे काम सुरू असताना दुर्घटना घडली. त्यामुळे काही कामगार कंटेनरमध्ये घुसले. त्यामुळे घटना घडण्यापूर्वी गोदामात कोण असावेत याची माहिती पोलिसांसह बचाव पथकांनी जमा केली. त्या माहितीनुसार सर्व जणांना जवानांनी बाहेर काढले. त्यापैकी १० जखमी अवस्थेत सापडले; तर आठ मृतावस्थेत सापडले. दरम्यानच्या दोन दिवसांत पोलिसांकडे कोणी बेपत्ता अथवा हरवल्याची माहिती आलेली नाही, तसेच मिळवलेल्या माहितीनुसार सर्वांची ओळख पटवण्यात आली. त्यामुळे रेस्क्यू जवानांनी सोमवारी सकाळी तीन वेळा अनाऊन्स करून तब्बल ४५ तासांनंतर हे बचाव कार्य थांबवले.


इमारत मालकावर गुन्हा दाखल
इंद्रपाल गुरुनाथ पाटील आणि इतर संबंधितांनी तळमजला अधिक दोन मजली इमारतीच्यावर बेकायदा खोल्यांचे बांधकाम केले होते. त्यावर मोबाईल टॉवर उभा केला. या इमारतीवर अधिक भार वाढवून सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणताही मेन्टेनन्स ठेवला नाही. त्यामुळे इमारत कोसळून कामगार आणि परिवारातील सदस्य मयत व जखमी झाले. तसेच कंटेनर, टेम्पोसह तीन दुचाकींचे आणि मालाचे नुकसान झाले, असा आरोप ठेवत नारपोली पोलिसांनी इंद्रपाल पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक समाधान चव्हाण हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com