आता अंबरनाथसह तुर्भेत झोपू योजना

आता अंबरनाथसह तुर्भेत झोपू योजना

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : झोपडपट्टी भागाचा पुनर्विकास करण्यासह तेथील नागरिकांना हक्काचे अधिकृत घर मिळावे यासाठी एसआरए योजना राबवण्यात येत आहे. आता या योजनेंतर्गत झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यासाठी आता ठाण्याबाहेरदेखील आपले हातपाय पसरण्यास झोपडपट्टी पुनर्वसन विभागाने (एसआरए) सुरुवात केली आहे. त्यानुसार पहिल्यांदाच अंबरनाथ येथे हा प्रकल्प राबवण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून प्रकाश नगर भागातील ७६३ रहिवाशांना हक्काचे अधिकृत घर मिळणार आहे. तसेच तुर्भे येथील एमआयडीसीमधील २९ प्लॉटवरदेखील लवकरच ही योजना राबवण्यासाठी एसआरएने कंबर कसली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत आणि धोकादक इमारतींसह झोपडपट्ट्यांमध्ये हजारो नागरिक आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत. या नागरिकांना हक्काचे व सुरक्षित घर मिळावे यासाठी शासनाच्या माध्यामतून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यात येत आहे. अशातच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०२० मध्ये एसआरए योजनेला एमएमआर क्षेत्रातही परवानगी देण्यात आली, परंतु त्यानंतर यात काही अडचणी आल्याने ही योजना पुढे सरकू शकली नव्हती. आता मात्र २०२३ मध्ये ठाण्यापाठोपाठ आता एसआरए योजनेंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रामध्ये घरे देण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार अंबरनाथ शिवमंदिर सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आता येथील आजूबाजूचा परिसरदेखील सुशोभित केला जाणार आहे. याच मंदिराच्या बाजूला असलेल्या प्रकाश नगर भागात झोपडपट्टीचा भाग आहे. प्रकाश नगर झोपटपट्टी १.४१ हेक्टरवर वसलेली आहे. या ठिकाणी ७६३ झोपड्या आहेत. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच येथील झोपडपट्टीचा ड्रोन सर्व्हे करण्यात आला आहे. येत्या काळात बायोमेट्रिक सर्व्हेचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती झोपडपट्टी पुनर्वसन विभागातील सूत्रांनी दिली. येथील रहिवाशांचे येथूनच बाजूला ५०० मीटरवर असलेल्या शासनाच्या मोकळ्या भूखंडावर पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासंदर्भात चर्चादेखील अंतिम पातळीवर आली आहे. त्याबदल्यात शासनाच्या महसूल विभागाला पर्यायी प्लॉट दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अंबरनाथपाठोपाठ नवी मुंबईतील तुर्भे येथील एमआयडीसीच्या जागेवर २९ प्लॉटवर झोपडपट्टी वसली आहे. येथील झोपडपट्टी भागाचादेखील झोपु योजनेंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यानुसार आता एसआरए विभागानेदेखील हा प्रकल्प राबवण्याच्या हालचाली सुरू केल्या असून या प्रकल्पासाठी एमआयडीसीनेदेखील परवानगी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com