भय इथले संपत नाही!

भय इथले संपत नाही!

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये नवनवीन टोलेजंग गृहप्रकल्पांचा धडाका सुरू असला, तरी बेकायदा आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. सर्व नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आलेले हे इमले आता लोकांचा जीव घेऊ लागले आहेत. गेल्या १३ वर्षांच्या इमारत दुर्घटनांचा आढावा घेतला असता या कालावधीत जिल्ह्यात ११ इमारती कोसळल्या असून त्यामध्ये १६७ जणांचा नाहक बळी गेला. केवळ बेकायदा इमारतीच नव्हे, तर आता जुन्या इमारतींचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. भिवंडी दुर्घटनेनंतर प्रशासन आता कोणती कठोर कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भिवंडी ग्रामीणमध्ये गेल्या आठवड्यात तीनमजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखालून आठ मृतदेह काढण्यात आले. तब्बल ४५ तासांच्या अथक परिश्रमानंतर अखेर हे बचावकार्य थांबवण्यात आले, पण यानिमित्ताने पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नेहमीप्रमाणे काही दिवसांमध्ये अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्याचे सोपस्कार सर्वच महापालिका करतील. त्यांना इमारती खाली करण्याचे फर्मान सोडतील आणि दुर्घटना घडल्यास हात झटकतील. वर्षानुवर्षे हाच खेळ सुरू आहे, पण सर्व नियम धाब्यावर बसवून उभ्या राहत असलेल्या बेकायदा इमारतींकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे. आज केलेले हेच दुर्लक्ष भविष्यात इमारत कोसळण्याचे कारण ठरेल, याचा विचार करायलाही कुणी धजावत नाही.

गेल्या १३ वर्षांतील इमारत दुर्घटनांचा आढावा घेतला असता या वस्तुस्थितीला पुष्टी मिळते. वास्तविक बेकायदा, धोकादायक इमारतीचा मुद्दा सर्वप्रथम प्रकर्षाने जाणवला तो मुंब्रा-डायघर येथील लकी कंपाऊंड दुर्घटनेने. सर्व नियम डावलून अवघ्या तीन महिन्यांत सात मजले चढवलेली ही बेकायदा इमारत ५ एप्रिल २०१३ रोजी पत्त्यांसारखी क्षणात कोसळली आणि हाहाकार झाला. तब्बल ७४ जणांचा बळी या दुर्घटनेत गेल्याने संपूर्ण राज्यातच नव्हे, तर देशात खळबळ उडाली. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाईचे गुऱ्हाळ अजून सुरूच आहे, पण तपासामध्ये अनेक गंभीर गोष्टी समोर आल्या. एक तर या इमारतीला पालिकेने कोणतीही परवानगी दिली नव्हती. वनविभाग आणि पालिकेने एकमेकांकडे बोट दाखवले. इमारत बांधण्यासाठी वा‍परण्यात आलेले साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते, पण ही दुर्घटना ठाणे जिल्ह्यातील पहिली किंवा शेवटची ठरली नाही. आज या दुर्घटनेला १० वर्षे झाली तरी समस्या तशीच आहे. गेल्या १३ वर्षांत ठाणे, भिवंडीमधील अनेक इमारती भुईसपाट झाल्या; तर उल्हासनगर येथील भ्रष्ट कारभाराचे स्लॅब कोसळून नाहक बळी गेले.

इमारत दुर्घटनांची कारणे
१. पाया कमकुवत असणे, स्ट्रक्चरल डिफॉल्टमुळे अनेक वेळा इमारती कोसळतात.
२. अनेक वेळा इमारत बांधताना निकृष्ट साहित्याचा वापर केला जातो. त्यातही इमारत बेकायदा असेल तर हा प्रकार सर्रास घडतो.
३. अकुशल कामगारांमुळे काँक्रीटच्या मिश्रणाचे प्रमाण चुकते. त्यामुळे दुर्घटना घडतात.
४. क्षमतेपेक्षा जास्त भार पडल्यावर इमारत कोसळते. अनेक वेळा जुन्या इमारतींना प्लास्टर चढवले जाते. पण आतून खिळखिळी झालेली इमारत त्या प्लास्टरचाही भार सहन करू शकत नसल्याने कोसळते.
५. पावसाळ्यात जुन्या इमारती तग धरत नाहीत. त्यामुळे या कालावधीत इमारत कोसळण्याचे प्रमाण सर्वाधिक असते.
६. इमारतीची कालमर्यादा संपल्यामुळे ती जीर्ण होऊन कोसळते. गेल्या काही वर्षांमध्ये ठाण्यातील अनेक इमारती या कारणाने जमीनदोस्त झाल्या.
७. तोडण्यात आलेल्या इमारतींचे स्लॅब पुन्हा जोडून उभारण्यात आलेल्या इमल्यांमध्येही दुर्घटना घडल्या आहेत.

क्लस्टरचे अडले घोडे
धोकादायक इमारतींच्या रहिवाशांना दिलासा मिळावा, त्यांना हक्काचे घर मिळावे, यासाठी ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करण्यात आली. नऊ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या योजनेचे सर्व आराखडे तयार आहेत, पण अजूनही प्रत्यक्ष कामाला कुठेच सुरुवात झालेली नाही. ही योजना ठाण्यात यशस्वी झाल्यास ती जिल्ह्याच्या पुनर्निर्माणासाठी ‘पॅटर्न’ ठरणार आहे, पण हा पल्ला गाठण्याआधी आणखी किती इमारती कोसळणार आणि किती बळी जाणार, असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे.

१३ वर्षांतील इमारत दुर्घटना
१७ ऑगस्ट २०१०
कळव्यातील चार मजली इमारत कोसळून १० जण ठार आणि २० जखमी झाले होते.

५ एप्रिल २०१३
मुंब्रा-डायघर भागातील लकी कंपाऊंड या बेकायदा इमारत दुर्घटनेत ७४ जणांचा नाहक बळी. ३६ जण जखमी झाले होते.

२९ जुलै २०१५
ठाकुर्ली येथील दोन मजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू.

५ ऑगस्ट २०१५
नौपाडा येथील कृष्ण निवास ही ५० वर्षे जुनी इमारत कोसळून १२ जणांचा मृत्यू; तर सात जण जखमी.

२१ सप्टेंबर २०२०
भिवंडीतील पटेल कंपाऊंड परिसरातील तीन मजली इमारत दुर्घटनेत ४१ बळी. २५ जणांना वाचवण्यात यश.

१५ मे २०२१
उल्हासनगरमधील बेकायदा इमारतीचा स्लॅब कोसळून तीन महिलांसह पाच जण ठार.

२९ मे २०२१
उल्हासनगर येथे पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू.

२० जुलै २०२१
कळवा परिसरात भूस्खलनामुळे इमारत कोसळून चार महिलांसह पाच जणांचा मृत्यू.

३ सप्टेंबर २०२१
भिवंडी पालिका क्षेत्रातील इमारत कोसळून एक ठार; तर नऊ जण जखमी.

१२ सप्टेंबर २०२१
राबोडी येथील खत्री इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू; तर एक जण जखमी.

२७ जानेवारी २०२३
भिवंडी खाडीपाडा येथील दुमजली इमारतीचा भाग कोसळून तरुणाचा बळी.

२९ एप्रिल २०२३
भिवंडी ग्रामीणमधील वळ गावात तीन मजली इमारत कोसळून आठ जणांचा मृत्यू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com