कैवल्यवारीत ‘अवघा रंग एक झाला’

कैवल्यवारीत ‘अवघा रंग एक झाला’

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : आषाढी वारीसाठी अवघे दोन महिने उरले असून वारकऱ्यांना आत्तापासूनच वारीचे वेध लागले आहेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ‘कैवल्यवारी’ या वारीच्या प्रवासावर आधारित भक्तिगीतांनी डोंबिवलीकरांना वारी घडवली. दिमाखदार आणि तितक्याच भावस्पर्शी अशा भक्तिगीतांत डोंबिवलीकर तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. कार्तिकी गायकवाड, सावनी शेंडे, अवधूत गांधी यांचे सूर आणि त्यासोबत पखवाज, पेटी, टाळ-मृदुंगाचा नाद अशा सुरेल संध्येत डोंबिवलीकरांचा अवघा रंग एकची झाला.
श्रिया क्रिएशन आणि वायर्ड एक्स्प्रेशन निर्मित कैवल्यवारी हा आषाढीवारी सोहळ्यावर आधारित भक्तिगीतांचा कार्यक्रम रविवारी (ता. ३०) सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात अवधूत गांधी यांनी ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ हे गीत गाऊन केली. त्यानंतर कार्तिकीने ‘लागली समाधी ज्ञानेशाची’ हे गीत सादर करता नाट्यगृह भक्तीमय झाले. याशिवाय विलास कुलकर्णी आणि अवधूत गांधी यांनी गायलेल्या ‘कानडा राजा पंढरीचा’ या गाण्याने रसिकांची मने जिंकली. यासोबतच विलास कुलकर्णी यांनी कैवल्यवारी या अल्बम मधील ‘येतो परतुनी देवा, माझी आठवण ठेवा’ हे विठ्ठल भेटीनंतर त्याचा निरोप घेतानाचे गीत सादर केले. कार्तिकी गायकवाड हिने गवळण आणि काही संत रचना सादर करून रसिकांची दाद मिळवली.

--------------------
वैष्णवांचे मिलन, दिवेघाटाचे वर्णन
आषाढी वारी सोहळ्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर आधारित काही गीते डोंबिवलीकर लेखिका वर्षा हुंजे यांनी लिहिली आहेत. माउलीचे आळंदीतून होणारे प्रस्थान, देहूतून जगद्गगुरू तुकोबारायांचे प्रस्थान झाल्यानंतर अनगड शाह बाबांच्या दर्ग्यावर होणारी आरती, दिवेघाटाचे वर्णन, जेजुरीत होणारे शैव आणि वैष्णवांचे मिलन, धावा, बंधुभेट, रिंगण आणि विठुरायाचे दर्शन घेऊन परत जाताना वारकऱ्यांची भावना यांवर आधारित ही गीते रचली गेली आहेत. कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वात पंडित आनंद भाटे आणि सावनी शेंडे यांनी ही गीते सादर केली. पंडित भाटे यांनी दिवे घाटाचे वर्णन करणारे ‘चालू सोबतीने वाट, चढू अवघड दिवेघाट’ यासोबतच ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ हे गीत सादर केले. सावनी शेंडे यांनीही अतिशय बहारदार गायन करत मैफिलीत रंग भरला तो ‘अवघा रंग एक झाला’ या गाण्यातून.

---------------------
महाराष्ट्रात ११ ठिकाणी प्रयोग
या कार्यक्रमात डॉ. वृषाली दाबके आणि त्यांच्या शिष्यांनी मिळून कैवल्यवारीतील काही गाण्यांवर अतिशय सुंदर नृत्याविष्कार सादर केले. या नृत्याविष्कारने रसिकांना मंत्रमुग्ध केले. चित्रकार उमेश पांचाळ यांनी एकीकडे भक्तिगीते सादर होत असतान दुसरीकडे विठ्ठलाचे अप्रतिम लाइव्ह पेंटिंग काढत रसिकांची दाद मिळवली. कैवल्यवारीचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी ११ प्रयोग करण्याचे नियोजन असल्याचे आयोजकांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com