करमणुकीसाठी खारघरकरांची पायपीट

करमणुकीसाठी खारघरकरांची पायपीट

खारघर, ता. २ (बातमीदार) : पाच लाख लोकसंख्या असलेल्या खारघर शहरातील नागरिकांना करमणुकीचे साधन म्हणून नाट्यगृह किंवा सिनेमाघर नसल्यामुळे थेट पनवेल अथवा नवी मुंबई गाठावे लागत आहे. कारण खारघर शहरात असलेले सिनेमाघर गेल्या दोन वर्षांपासून बंद असून करमणुकीसाठी खारघरकरांची पायपीट सुरू आहे.
खारघर शहरात पन्नासहून अधिक शाळा आणि पंधराहून अधिक महाविद्यालये आहेत. त्यामुळे शैक्षणिक शहर म्हणून नावलौकिक असलेल्या या शहरात महाविद्यालयीन विद्यार्थांची संख्या पन्नास हजाराच्या घरात आहे. एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर शहरात लिटिल वर्ल्ड मॉल, ग्लोमॅक्स, रिलायन्स मार्ट, फ्रेश, प्राईम मॉल, डी मार्ट असे एकापेक्षा एक नामाकिंत मॉल आहेत. यापैकी लिटिल वर्ल्ड मॉल, ग्लोमॅक्सबरोबरच खारघर सेक्टर १३ मध्ये सिनेमाघर होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून खारघरमधील सर्व सिनेमाघर बंद असल्यामुळे चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी तरुणवर्गासह नोकरदारांना आता पनवेल किंवा नवी मुंबईतील शहरांमध्ये जावे लागत आहे.
-------------------------------------
मॉलकडे ग्राहकांची पाठ
लिटिल वर्ल्ड मॉलमध्ये महिनाभरात जवळपास तीन ते सव्वातीन लाख ग्राहक भेट देत होते; पण सिनेमा घर बंद असल्यामुळे ही संख्या जवळपास दोन लाखांनी कमी झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून ग्राहकांच्या संख्येत झालेली घट मॉलमधील व्यावसायिकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे.
---------------------------------------
कोरोनामुळे अनेकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अशातच गेल्या वर्षभरापासून लिटिल वर्ल्डमधील सिनेमाघर बंद असल्यामुळे व्यवसायांवर देखील परिणाम झाला आहे. सिनेमा घर सुरु असणे आवश्यक आहे.
-अक्षय गोरड, कटलरी विक्रेता
-------------------------------------
मॉलमधील सिनेमा घर काही महिन्यापासून बंद आहे. ते लवकर सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- तुषार खरात, व्यवस्थापक, लिटिल वर्ल्ड मॉल
-------------------------------------
सुट्टीच्या दिवशी विरंगुळा म्हणून सिनेमा पाहण्याची इच्छा होते. मात्र, खारघरमध्ये एकही सिनेमाघर सुरू नसल्याने आर्थिक भुर्दंड सोसत पनवेल किंवा नवी मुंबईत जावे लागते.
- अरुण कदम, रहिवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com