वाडिया रुग्णालयाकडून इम्युनो डेफिशियन्सीवर अभ्यास

वाडिया रुग्णालयाकडून इम्युनो डेफिशियन्सीवर अभ्यास

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : परळ येथील बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाने प्रायमरी इम्युनो डेफिशियन्सीवर केलेला अभ्यास अमेरिकन ॲकॅडमी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. प्रगत पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत वाडिया रुग्णालयाच्या उपचार प्रणालीची नोंद या जर्नलमध्ये करण्यात आली आहे. प्रायमरी इम्युनो डेफिशियन्सी हा विकारांचा असा एक समूह आहे, ज्यामध्ये मुलांची रोगप्रतिकारक शक्ती ही संक्रमणाशी लढू शकत नाही किंवा त्याविरोधात स्वयंप्रतिकारशक्ती निर्माण करू शकत नाही. तसेच यातील काही मुलांना अस्थिमज्जा प्रत्यारोपणाने वेळेत उपचार न मिळाल्यास गंभीर संसर्ग होऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो.

भारतातील प्राथमिक इम्युनो डेफिशियन्सीच्या प्रसाराविषयी खात्रीशीर आकडेवारी उपलब्ध होत नाही. कारण बहुतेक मुले निदानापूर्वीच मरण पावत असल्याचे निदर्शनास आले आहे; मात्र १.३ अब्ज लोकसंख्येच्या तुलनेत १ दशलक्षाहून अधिक रुग्णांना प्रायमरी इम्युनो डेफिशियन्सी (पीआयडी) असण्याची शक्यता वर्तवली जाते. वाडिया रुग्णालयाच्या टीमने ‘जर्नल ऑफ ॲलर्जी आणि क्लिनिकल इम्युनोलॉजी : ग्लोबल’ या जर्नलमध्ये प्रायमरी इम्युनो डेफिशियन्सी असलेल्या २१ मुलांचा शोधनिबंध प्रकाशित केला आहे. पीआयडीसाठी प्रत्यारोपणाची ९५ टक्के मुले एका वर्षानंतर फॉलोअपवर जिवंत होती; तर ८६ टक्के त्यांच्या आजारातून पूर्णपणे बरी झाली होती. अभ्यासातून समोर आलेली माहिती सूचित करते, की इम्युनो डेफिशियन्सीमुक्त आणि चांगल्या गुणवत्तेसह संपूर्ण प्रायमरी इम्युनो डेफिशियन्सी असलेल्या बहुतेक मुलांमध्ये उपचार आणि प्रत्यारोपणाचा वापर केला जाऊ शकतो.
...................................
उशिरा निदानाचा धोका कायम
उपचारांदरम्यान उशिरा निदान आणि निदानाच्या वेळी अनेक संक्रमणांची शक्यता असते. बीएमटी युनिटचे प्रमुख डॉ. प्रशांत हिवरकर यांनी सांगितले, की आम्ही अनेकदा फुप्फुस, यकृत आणि मेंदूत गुंतागुंत झालेली मुले पाहतो. आम्ही प्रत्यारोपण केलेल्या तीनपैकी एका मुलाला आयसीयू आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता असते. क्लिनिकल स्थिती सुधारल्यानंतर प्रत्यारोपणाची योजना तयार करावी लागते.
.......................
अस्थिमज्जा प्रत्यारोपण करणाऱ्या पीआयडी रुग्णांच्या अहवालानुसार सहायक उपचार आणि प्रत्यारोपण हे अल्गोरिदम प्रायमरी इम्युनो डेफिशियन्सी असलेल्या मुलांमध्ये जागतिक स्तरावर फायदेशीर ठरू शकते. या रुग्णांना गुंतागुंतीपूर्वी प्रत्यारोपणासाठी पाठवले तर त्यांच्या प्रकृतीत सुधार होऊ शकते.
- डॉ. अंबरीन पांड्रोवाला, बोन मॅरो आणि इम्युनोलॉजी सल्लागार
---
या केसेसमध्ये इतर खासगी रुग्णालयांतील जगण्याचा दर ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत आहे. अनेकदा रुग्णांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता अनेक गोष्टी केल्या जातात.
- डॉ. मिनी बोधनवाला, सीईओ, वाडिया रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com