आपातकालीन धोके घटवण्याबाबत जी २० परिषदेची बैठक मुंबईत

आपातकालीन धोके घटवण्याबाबत जी २० परिषदेची बैठक मुंबईत

मुंबई, ता. २ : मोठ्या शहरांमधील आपत्कालीन धोके कमी करण्यासंदर्भात जी-२० परिषदेच्या कार्यगटाची बैठक मुंबईत २३ ते २५ मे या कालावधीत होणार असून यासंदर्भात महापालिकेत आज आढावा घेण्यात आला.

मुंबईने आतापर्यंत सहन केलेल्या विविध धोक्यांच्या अनुभवातून यावर प्रतिबंधात्मक अनेक उपाय उदा. सीसीटीव्हीचे जाळे, सुरक्षेचे विविध उपाय, आपत्कालीन नियंत्रण कक्ष करण्यात आले आहेत. यासंदर्भात मुंबईच्या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाखाणणी केली जाते. या बैठकीच्या निमित्ताने जी-२० कार्यगटातील आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मुंबई महापालिकेला भेट देऊन या उपाययोजनांची पाहणी करतील. यात मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाचा अभ्यास दौरा तसेच महापालिका इमारतीचा हेरिटेज वॉक या बाबी असतील.
या पार्श्वभूमीवर महापालिका तसेच इतर यंत्रणा करीत असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुख्यालयात बैठक घेतली. मे महिन्यात जी-२० परिषदेच्या एकूण तीन कार्यगटांची बैठक होत आहे. त्यामुळे या तीनही बैठकांच्या निमित्ताने सर्व संबंधित विभागांच्या हद्दीत रस्ते, स्वच्छता, सुशोभीकरण इत्यादींची कामे मागील बैठकांच्या वेळी असणारा अनुभव लक्षात घेऊन पूर्ण करावीत. त्याबाबतच्या पूर्वतयारीचा आढावादेखील पुढील आठवड्यात घेतला जाईल, असे आयुक्तांनी नमूद केले. या बैठकीस महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, केंद्र सरकारच्या जी-२० परिषदेच्या संचालक मृणालिनी श्रीवास्तव, पत्रसूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक मोनीदीपा मुखर्जी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर, प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे, राज्य सरकारच्या राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव मिलिंद हरदास यांच्यासह वरिष्ठ पोलिस व इतर विविध यंत्रणांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

---
समन्वय राखून कामे पूर्ण करा : चहल
आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात मुंबईने केलेली कामगिरी जी-२० परिषदेच्या निमित्ताने जगासमोर आणण्याची संधी आहे. हे लक्षात घेता महापालिकेसह सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय राखून कामे पूर्ण करावीत, असे निर्देशही आयुक्त चहल यांनी प्रशासनाला या वेळी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com