Sakal Premier Award 2023 Ceremony Sun Marathi
Sakal Premier Award 2023 Ceremony Sun Marathi sakal

Sakal Premier Awards 2023 : आज ‘सन मराठी’वर मनोरंजनाची अस्सल मैफल!

भव्यदिव्य ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार’ सोहळ्याचे दिमाखदार प्रसारण

मुंबई : मनोरंजन विश्वातील कलाकार व तंत्रज्ञ मंडळींच्या सुप्त कलागुणांचा गौरव करणारा, तसेच त्यांना अधिकाधिक उत्तम काम करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देणारा ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार’ सोहळा उद्या (ता. १४) ‘सन मराठी’ वाहिनीवर सायंकाळी साडेसहा वाजता पाहायला मिळणार आहे. पीएनजी ज्वेलर्स लि. सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत.

ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात नुकत्याच पार पडलेल्या ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार’ सोहळ्यासाठी मराठी रंगभूमीबरोबरच छोट्या व मोठ्या पडद्यावरील अनेक कलाकार व तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. आजच्या तरुण कलाकारांपासून अनेक दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकार सोहळ्यात आवर्जून सहभागी झाले होते.

सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील मंडळींची उपस्थिती उल्लेखनीय ठरली. चमचमत्या ताऱ्यांचा लखलखता कलाविष्कार सगळ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या दिलखेचक सूत्रसंचालनाने उपस्थित सगळ्यांची मने जिंकली. चित्रपट बनविण्यासाठी त्या दोघांमध्ये लागलेली लुटुपुटुची अहमहमिका अवघ्या नाट्यगृहात हास्याची फवारणी करत होती.

अभिनेत्री नेहा महाजन व स्वामिनी वाडकर यांनी केलेले गाण्यांचे सादरीकरण रसिकांची दाद घेऊन गेले. अमिता कुलकर्णी आणि अभिनेता रोहित शिवलकर यांनी ‘हवास मज तू’ आणि ‘भिजूनी गेला वारा’ गाण्यांवर सादर केलेल्या नृत्याने रसिकही काही काळ धुंद झाले होते. अभिनेत्री मानसी नाईकने रिमिक्स लावण्यांवर सादर केलेले नृत्य नेहमीप्रमाणेच प्रेक्षकांना घायाळ करणारे ठरले. तिने आपल्या तालावर अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री किशोरी शहाणे यांनाही थिरकायला लावले.

त्यांचा नृत्याविष्कार पाहताच उपस्थित सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अभिनेत्री पूजा सावंतने अस्सल ठसकेबाज लावणीचा अप्रतिम नजराणा सादर केला. रसिकांनी तिच्याही नृत्याला उत्स्फूर्त दाद दिली. पुष्कर जोगनेही आपल्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकून घेतली. संजय मोने यांच्या स्टॅण्डअप कॉमेडीने सगळ्यांना चांगलेच हसविले. सोहळ्यात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

अभिनेते प्रशांत दामले यांचे रंगभूमीवरील उत्तुंग कामगिरीबद्दल ‘नाट्यसेवा सन्मान’ पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आले. या वेळी विविध विभागांतील पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.ज्युरी स्पेशल पुरस्कार ‘आपडीथापडी’ चित्रपटासाठी अभिनेता श्रेयस तळपदेला मिळाला.

‘अनन्या’ चित्रपटासाठी अभिनेत्री हृता दुर्गुळेला गौरवण्यात आले. अत्यंत जोशपूर्ण आणि उत्साहवर्धक वातावरणात ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळा’ पार पडला. उद्या (ता. १४) सायंकाळी साडेसहा वाजता ‘सन मराठी वाहिनी’वर चमचमत्या ताऱ्यांचा लखलखाटी सोहळा प्रसारित होणार आहे.

प्रेमा साखरदांडे यांचा सन्मान
९३ वर्षांच्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे ‘सकाळ’ आणि मराठी चित्रपटसृष्टीवरील प्रेमापोटी आवर्जून सोहळ्याला उपस्थित होत्या. त्यांचाही या वेळी यथोचित सत्कार करण्यात आला. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना प्रेमळ सल्लाही दिला. त्या म्हणाल्या, ‘‘झाडे बहरावी म्हणून आपण जसे मुळांना पाणी घालतो तसे कलादालनाच्या बाबतीतसुद्धा पालकांनी करायला हवे. आपल्या मुलांमध्ये कोणते गुण आहेत... त्यांचा आपल्याला कसा विकास करता येईल, याचा विचार त्यांनी करावा.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com