ग्रामसेवेची स्वदेशी चळवळ

ग्रामसेवेची स्वदेशी चळवळ

मिलिंद तांबे, मुंबई
महात्मा गांधी यांनी ‘गावाकडे चला’ असा नारा दिला. खरा देश हा गावांमध्येच असल्याची त्यांची धारणा होती; मात्र काळाच्या ओघात गावांकडे दुर्लक्ष झाले. शिक्षण, नोकरीच्या शोधात तरुणांनी शहराकडे धाव घेतली. त्यामुळे गावे ओस पडू लागली. खेड्यांमध्ये आजही सुविधांची वानवा आहे. या खेड्यांना सुख-सुविधा पुरवण्याचे काम स्वदेश फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे. गेल्या १० वर्षांत त्यांनी अनेक गावांना स्वयंपूर्ण बनवले आहे. त्यामुळे खेड्यांतील लोकांचे जीवनमान बदलले आहे.

सुधागड तालुक्यातील भावशेत ठाकूरवाडी ते हाताच्या बोटावर मोजण्याइतकी घरे असणारे छोटेसे खेडे. लोकसंख्येने शंभरीदेखील पार केलेली नाही. गुंठावार असणारी शेती करून आपला उदरनिर्वाह येथले लोक करतात. हातावर पोट असणारे या खेड्यातील लोक. गावात ना रस्ता, ना पाणी. स्वच्छतेच्या नावानेही मोठी बोंब; कारण गावामध्ये कचऱ्‍‌याचे नियोजन होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. पुरुष मंडळी शेतावर काम करण्यास जात असली, तरी महिला या घरीच असत. गावाच्या सुधारणेकडे मात्र फारसे कुणाचे लक्ष नव्हते.
एके दिवशी या खेड्यामध्ये स्वदेश फाऊंडेशनची काही मंडळी आली. त्यांनी या गावाचा कायापालट करण्याचे ठरवले; मात्र यासाठी गावातील लोकांचा विश्वास संपादन करणे गरजेच होते. यासाठी स्वदेशचे समन्वयक शिवदास वायाळ यांनी पुढाकार घेतला. दररोज गावात येऊन लोकांशी चर्चा करणे, त्यांना विश्वासात घेणे यासाठी बैठका होऊ लागल्या. अखेर गावाचा कायापालट करण्यास लोक तयार झाले; मात्र यात मोठी अडचण होती, ती लोकांच्या स्वतःच्या योगदानाची. यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आणि खऱ्या अर्थाने गावाचा कायापालट सुरू झाला.

पाण्याची समस्‍या सोडवली
गावातील सर्वात मोठी समस्या होती ती पिण्याच्या पाण्याची. त्यामुळे सर्वप्रथम गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यावर भर देण्यात आला. स्वदेश फाऊंडेशनने पाण्यासाठी गावात बोरवेल खोदली. त्यातील पाणी साठवण्यासाठी पाण्याची टाकी बांधण्यात आली. या टाकीच्या माध्यमातून घराघरात पाणी पोचवण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आल्या. पाण्याला मोटार लावण्यात आली; पण त्यासाठी लागणारी मोटार सौरऊर्जेवर लावण्यात आली. त्यामुळे विजेची बचत तर झालीच; शिवाय विजेचे लाखो रुपयांचे बिल ही वाचले. या पाण्याचे नियोजन स्वतः महिला करत आहेत.

श्रमदानातून रस्‍ता
गावात पक्का रस्ता नव्हता. स्वदेश फाऊंडेशनच्या माध्यमातून रस्ता बनवण्याचे काम सुरू झाले. ग्रामस्थांनी यासाठी श्रमदान केले. येथेही महिलांनी पुढाकार घेतला, हे विशेष. सरकारी मदतीशिवाय गावातील रस्ता पूर्ण झाला. अशाच प्रकारे गावात साफ-सफाई करण्यात आली. कचऱ्याचे नियोजन करण्यात आले. महिलांसाठी बचत गट, त्यातून पापडासारखे लघू उद्योग व रोजगारही सुरू झाला.

या जिल्‍ह्यातही गावांमध्ये सुधारणा
सुधागड तालुक्यातील सातपेक्षा अधिक गावांचा विकास करण्यात आला. या तालुक्याशिवाय रायगड, पालघर आणि नाशिकमधील गावे आणि पाड्यांमध्ये स्वदेश फाऊंडेशनच्या माध्यमातून काम केले जात आहे. स्वयंपूर्ण आणि स्वच्छ ग्राम ही स्वदेश फाऊंडेशनची संकल्पना आहे.     

‘एक गाव, एक रंग’ संकल्‍पना
स्‍वदेश फाऊंडेशच्या एक गाव, एक रंग या संकल्‍पनेतून अनेक गावे उजळून निघाली आहेत. गावामध्ये एकोपा निर्माण व्हावा, हा यामागील उद्देश आहे. अनेक गावांतील घरांच्या रंगसंगती या एकसारख्या दिसत आहेत. शासकीय यंत्रणेची वाट न बघता कचरा होऊ न देणे, कचऱ्‍याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे यावर भर दिला जात आहे. गावांमध्ये वाहते सांडपाणी, दुर्गंधी जाणवत नाही. यामुळे आजारांचे प्रमाणही कमी झाले आहे.

शाळांचेही रूप पालटले
शाळांची डागडुगी करण्यात आली आहे. शाळेतील मुलांना आवश्यक शालोपयोगी वस्तू पुरवल्या जात आहेत. मुलांना अभ्यासाची गोडी लागावी, यासाठी शाळेमध्ये प्रोजेक्टर बसवण्यात आले आहेत. शाळांची रंगरंगोटी केली आहे तसेच शाळांमध्ये छोटेखानी ग्रंथालयदेखील सुरू करण्यात आली आहेत. या मध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तके विनामूल्य वाचण्यास मिळत असून मुलांमध्ये वाचनाची गोडी लागत आहे.

व्यवस्थापन समिती
प्रत्येक गावामध्ये ग्रामस्थांनी व्यवस्थापन समन्वय समिती गठित केली आहे. या समितीच्या माध्यमातून गावातील कामांचे नियोजन केले जाते. प्रत्येक गोष्टीची नोंद वहीमध्ये केली जाते. या समितीमध्ये महिला आणि पुरुष यांना प्रतिनिधित्व दिले जाते. स्वदेशच्या या नियमावलीने ग्रामस्थ मनापासून काम करतात.

अमृत महोत्सवानिमित्त पंचाहत्तरी
देशाच्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्‍याच्या निमित्ताने स्वदेश फाऊंडेशनने ७५ गावांच्या कायापालट करण्याचा निर्धार केला होता. तो त्यांनी पूर्ण केला आहे. रायगड, पालघर, नाशिकमध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. येथे सुरू असलेल्या कामांचा आढावा देखील घेतला जातो. यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक स्वदेशने केली आहे.

सुविधांची कमतरता असणारी गावे निवडली जातात. त्या गावातील लोकांशी चर्चा करून त्यांना आमच्या प्रकल्पाशी जोडले जाते. ग्रामस्थांची श्रमदानाची तयारी असेल, तरच त्या गावात कामाला सुरुवात केली जाते. स्वदेश फाऊंडेशन आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून हे काम केले जाते.
- शिवदास वायाळ, समन्वयक, स्वदेश फाऊंडेशन

आमच्या गावात पाण्याची फार समस्या होती. स्वदेश फाऊंडेशनच्या मदतीने पाण्याची व्यवस्था झाली खरी; पण त्यातील महत्त्‍वाची जबाबदारी आम्हा महिलांवर होती. ती जबाबदारी आम्ही घेण्याचे ठरवले.
- समिधा खराडे, ग्रामस्थ

स्वदेश फाऊंडेशनच्या प्रयत्नामुळेच आमच्या गावातील सर्व महिला एकत्र आल्या आहेत. यातून आम्ही बचत गटाची स्थापनाही केली आहे. त्यामुळे महिला आर्थिक स्वावलंबी झाल्या आहेत.
- गायत्री कदम, ग्रामस्थ

गावातील महिलांमध्ये आत्मविश्वास आला आहे. कोणतेही काम करण्यास आता महिला पुढाकार घेतात. पुरुष आम्हाला मदत करतात.
- गीता कदम, स्थानिक

स्वदेश फाऊंडेशनच्या मदतीमुळे आमचे गाव स्वयंपूर्ण झाले आहे. आता कोणतेही काम शासकीय अनास्थेमुळे अडत नाही. एकेकाळी ओस पडणारी गावं आता पुन्हा बहरू लागली आहेत. कोविडनंतर शहरात गेलेली लोकं आता गावाकडे परतू लागली आहेत.
- सोनाली पवार, ग्रामस्थ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com