उदरनिर्वाहासाठी चिमुकल्यांचा हातभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उदरनिर्वाहासाठी चिमुकल्यांचा हातभार
उदरनिर्वाहासाठी चिमुकल्यांचा हातभार

उदरनिर्वाहासाठी चिमुकल्यांचा हातभार

sakal_logo
By

संदीप साळवे, जव्हार
सध्या शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी आहे. या सुट्टीची मजा मुले आनंदाने घेत असतात. विविध खेळ, फिरायला जाणे, उन्हाळी शिबिर यामध्ये मग्न आहेत. मात्र, पालघर जिल्ह्यातील जव्हारमधील मुले यांनी वेगळाच मार्ग अवलंबला आहे. सध्या हीच मुले रानावनातून फिरून रानफळे जमा करून बाजारात विक्रीस आणत आहेत. यात त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक हातभार लावून व्यवहाराचे ज्ञानही आत्मसात करत आहेत.
पर्यटनाच्या दृष्टीने जव्हार तालुक्यात निसर्गाने मुक्तहस्तांनी रंगांची उधळण केली आहे. याच भागातील जंगल संपत्तीतून अनेक प्रकारचे फळे, फुले, वेलवर्गीय तथा फळभाजी असे विविध जिन्नस उपलब्ध होत असतात. सध्या जंगलात रानफळे बहरली आहेत. त्यात मुलांना उन्हाळी सुट्टी लागली आहे. या सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबीयांना हातभार लावण्यासाठी मुले पुढे आली आहेत. हे शालेय विद्यार्थी जंगलातून जांभळे, करवंद, आंबे असे नाना प्रकारची फळे घेऊन जव्हार शहरात विक्रीला आणत आहेत. ही अस्सल जंगली रानमेव्याची चव चाखण्याचे खवय्ये सुद्धा काही तासांतच ती खरेदी करत आहेत. त्यामुळे या बालकांना फळे विक्रीतून चांगला व्यवसाय उपलब्ध झाला आहे. ही फळे विक्री केल्यानंतर यापासून मिळणाऱ्या अर्थार्जनामधून पुढील शैक्षणिक वर्षासाठी व्यवस्था आणि कपडे खरेदी करणे; तसेच आवडीच्या वस्तू घेण्यासाठी पैसे साठवले जात आहेत.

उदरनिर्वाहासाठी धडपड...
दिवसभरात घरी राहिलेली मुले, महिला, पुरुष जंगलातील हा रानमेवा तोडून घरी आणून ठेवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून ही मंडळी डोक्यावर हा रानमेवा घेऊन जव्हार शहरामध्ये दाखल होत असतात. दिवसाकाठी पाचशे ते आठशे रुपये त्यांना मिळत आहेत. जाताना या पैशात उदरनिर्वाहासाठी लागणारे साहित्य ते घेऊन जात आहेत. उन्हात पायपीट करून घाम गाळून पैसे कमावत आहेत. घरातून बांधून आणलेली चटणी, भाकर किंवा वडापाव खाऊन दिवस भर या रानमेव्याची ती विक्री करत आहेत. रात्री उशिरा परतीची वाट धरत आहेत.


गावोगावी आरोळ्या...
आंबा, फणस, जांभळे, करवंद हा रानमेवा बहरू लागला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेक महिला, पुरुष आणि शालेय विद्यार्थी जंगलातील हा रानमेवा घेऊन गावोगावी; तसेच शहरात विक्रीसाठी आणू लागले आहेत. ''जांभळं घ्या जांभळं, करवंदे'' अशा त्यांच्या आरोळ्या परिसरात घुमू लागल्या आहेत. बालचमू हा रानमेवा खरेदीसाठी गर्दी करत आहे.

शहरात रानमेव्याला चांगली मागणी आहे. उन्हात दिवसभर फिरून त्रास होतो; मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी हे करावे लागते. महिनाभर हा रानमेवा असतो. त्यामुळे आर्थिक हातभार लागतो. दिवसाकाठी ५०० ते हजार रुपये मिळत आहेत. कुणी भाकरी तुकडा दिला, तर तिथेच बसून भूक भागवतो. नाहीतर वडापाव खाऊन दिवस काढतो.
- दिगंबर कडू, शालेय विद्यार्थी