सहायक आयुक्तांच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहायक आयुक्तांच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर
सहायक आयुक्तांच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर

सहायक आयुक्तांच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २८ (बातमीदार) ः घाटकोपर परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर सुरू असलेल्‍या कारवाईबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. यामध्ये सहायक आयुक्त संजय सोनवणे यांना फेरीवाल्यांकडून धमकी मिळत असल्‍याची माहिती सोनवणे यांच्या दुजोऱ्यासह दिली होती. याची दखल घेत घाटकोपरमधील सामान्य नागरिक सहायक आयुक्‍तांच्या समर्थनार्थ रस्‍त्‍यावर उतरले आहेत.
संजय सोनवणे यांची महापालिकेच्या एन वार्ड कार्यालयाच्या दालनात मोकळा श्वास अभियानचे अध्यक्ष मनसेचे माजी शाखाध्यक्ष राजू सावंत, विनोद जाधव, बाबुराव दळवी, सुनील चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट घेत पाठिंबा याबाबतचे निवेदन दिले.
मुंबईसह उपनगरात अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची सातत्याने कारवाई सुरू आहे. एन प्रभागातील बेशिस्त फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची धडाकेबाज कामगिरी गेल्या काही दिवसांपासून सहायक आयुक्त संजय सोनवणे यांच्याकडून घाटकोपर विभागात सुरू आहे. सकाळी सातवाजल्या पासूनच कारवाई सुरू राहिल्याने अज्ञात फेरीवाल्यांकडून धमकी मिळत असतानाही या बाबत पोलिसांत तक्रार न करता सहायक आयुक्‍तांनी ही कारवाई सुरूच ठेवली आहे.

फेरीवाल्यांविरोधात मोकळा श्वास अभियान
मोकळा श्वास अभियान हे घाटकोपर मधील नागरिकांनी फेरीवाल्यांविरोधात तयार केलेली संस्था असून ही संस्था गेल्या काही वर्षांपासून घाटकोपर विभागातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आवाज उठवत आहे. फेरीवाल्यांकडून आयुक्तांना धमकी मिळाल्याचे कळताच मोकळा श्वास अभियानाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला. सहायक आयुक्त संजय सोनवणे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवत असल्याचे निवेदन संस्थेकडून देण्यात आले.

सहायक आयुक्त हे गेल्या काही दिवसांपासून धडक कारवाई करत आहेत. असे असताना बेशिस्त फेरीवाले त्यांना धमकी देत असतील, तर घाटकोपरमधील जनता सहायक आयुक्तांसोबत आहे. पालिका अधिकारी यांच्यावर अनेकदा हल्ले झाले आहेत. आम्ही सामान्य जनता असे हल्ले सहन करणार नाही.
- राजू सावंत, अध्यक्ष, मोकळा श्‍वास अभियान

जे योग्य वाटते ते मी करत आहे. फेरीवाल्यांनीसुद्धा लोकांना त्रास होणार नाही, अशी भूमिका घ्यायला पाहिजे. मात्र त्यांचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी दररोज येत आहेत. सामान्य लोकांना त्रास होणे, हे मी खपवून घेत नाही. तसेच लोकांचे प्रेम पाहून मीदेखील भारावलो आहे.
- संजय सोनवणे, सहायक आयुक्त