
घोणसे घाटात डिझेल टँकर उलटला
श्रीवर्धन, ता. २८ (बातमीदार) : म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटात डिझेलची वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना रविवारी (ता. २८) घडली. या अपघातामुळे टँकरमधील तब्बल शेकडो लिटर डिझेल रस्त्यावर सांडले. सुदैवाने म्हसळा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीपन सोनावणे यांनी वेळीच मदतकार्य सुरू केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. शिवाय पाण्याचा टॅंकर बोलावून रस्त्यावरील डिझेलची स्वच्छता करण्यात आली. श्याम सरोज हा मुंबईहून श्रीवर्धनकडे डिझेलची वाहतूक करत होता. घोणसे घाटात अवघड वळणावर भरधाव टँकर चालवत असताना वाहनावरील ताबा सुटला व टँकर उलटा झाला. या अपघातामुळे टँकरमधील डिझेल काही वेळ रस्त्यावर सांडत होते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तत्काळ श्रीवर्धन नगरपरिषदेच्या अग्निशमन वाहनाला पाचारण केले व टँकर उभा करून वाहतूक मोकळी केली. कडक उन्ह व त्यात डिझेल हे ज्वलनशील द्रव पदार्थ असल्याने पाण्याचा टॅंकर मागवून रस्ता स्वच्छ करण्यात आला. म्हसळा पोलिस ठाण्यात टँकरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.